महाराष्ट्र

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला जिल्हास्तरावर सर्वोच्च प्राधान्य द्या–मंत्री जयकुमार गोरे

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाला जिल्हास्तरावर सर्वोच्च प्राधान्य द्या – मंत्री जयकुमार गोरे

मुंबई (प्रतिनिधी):- मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी प्रचार व व्यापक प्रसिध्दीसाठी जिल्हास्तरावर सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने व प्राधान्याने काम करावे. विशेषतः जिल्हा परिषदांनी या अभियानाला सर्वोच्च प्राधान्य देऊन त्याची अंमलबजावणी आणि जनजागृती प्रभावीपणे करावी, असे स्पष्ट निर्देश ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

या अभियानाच्या प्रचार व प्रसिध्दीच्या अनुषंगाने मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत मंत्री गोरे बोलत होते. बैठकीस ग्रामविकास विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले यांच्यासह विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

या वेळी राज्यभरात मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाची अंमलबजावणी कशा पद्धतीने सुरू आहे, याचा सविस्तर आढावा घेण्यात आला. अभियानाच्या प्रचारासाठी राबविण्यात येणाऱ्या कार्यपद्धती, विविध माध्यमांचा प्रभावी वापर, तसेच ग्रामस्थांचा आणि लोकप्रतिनिधींचा सक्रिय सहभाग वाढविण्याबाबत सखोल चर्चा करण्यात आली.

मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले की, हे अभियान ग्रामीण विकास, पारदर्शक प्रशासन आणि लोकसहभाग वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसेच संबंधित सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून नियोजनबद्ध पद्धतीने काम करणे आवश्यक आहे. अभियानाची माहिती प्रत्येक गावापर्यंत पोहोचवून त्यामध्ये ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यावर भर द्यावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.

या बैठकीत प्रचारासाठी स्थानिक पातळीवर नाविन्यपूर्ण उपक्रम, जनसंवाद, सभासद व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आणि विविध शासकीय योजनांची माहिती एकत्रितपणे लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या उपाययोजनांवरही चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण स्वराज्य संस्था अधिक सक्षम होतील, प्रशासनात पारदर्शकता वाढेल आणि विकासकामांना गती मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!