मनरेगाचा ऐतिहासिक निर्णय:’पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’ म्हणून नवी ओळख, रोजगाराचे दिवस १२५ पर्यंत वाढले
मनरेगाचा ऐतिहासिक निर्णय:’पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’ म्हणून नवी ओळख, रोजगाराचे दिवस १२५ पर्यंत वाढले
नवी दिल्ली (प्रतिनिधी) :- केंद्र सरकारने ग्रामीण रोजगार क्षेत्रात एक महत्त्वपूर्ण निर्णय घेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा – MGNREGA) या योजनेचे नाव बदलले आहे. आता ही योजना ‘पूज्य बापू ग्रामीण रोजगार योजना’ या नावाने ओळखली जाणार आहे. यासोबतच, योजनेअंतर्गत मिळणाऱ्या रोजगाराच्या दिवसांमध्येही वाढ करण्यात आली असून ग्रामीण कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय मंत्रिमंडळाने या नावबदलासह कामाच्या दिवसांची मर्यादा १०० वरून १२५ दिवसांपर्यंत वाढवण्यास मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता ग्रामीण भागातील प्रत्येक पात्र कुटुंबाला एका आर्थिक वर्षात किमान १२५ दिवसांचे रोजगार हमी स्वरूपात मिळणार आहेत.
मनरेगा ही देशातील सर्वात मोठ्या सामाजिक सुरक्षा योजनांपैकी एक मानली जाते. ग्रामीण भागातील बेरोजगारी कमी करणे, स्थलांतर रोखणे आणि कुटुंबांना आर्थिक आधार देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. सध्या या योजनेअंतर्गत १५ कोटींपेक्षा अधिक नागरिक कार्यरत असून, यामध्ये सुमारे एक-तृतीयांश महिलांचा सहभाग आहे.

ही योजना मूळतः २००५ साली राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा या नावाने सुरू करण्यात आली होती. त्यानंतर २००९ मध्ये तिचे नाव बदलून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना असे करण्यात आले. आता तब्बल दीड दशकानंतर या योजनेचे पुन्हा एकदा नामकरण करण्यात आले असून, त्यासोबत लाभातही लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.
ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देणे, रोजगाराच्या संधी वाढवणे आणि गरिबांच्या हाताला काम देणे या उद्देशाने घेतलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे लाखो ग्रामीण कुटुंबांना आगामी काळात आर्थिक स्थैर्य मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, या निर्णयाची अंमलबजावणी लवकरच देशभरात सुरू केली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारचा हा निर्णय ग्रामीण भारतासाठी मैलाचा दगड ठरण्याची शक्यता व्यक्त होत आहे.



