महाराष्ट्र

भीमा कोरेगाव अभिवादनासाठी अभेद्य सुरक्षा; ७,२०० पोलीस, ड्रोन व सीसीटीव्हीचा कडेकोट बंदोबस्त

भीमा कोरेगाव अभिवादनासाठी अभेद्य सुरक्षा; ७,२०० पोलीस, ड्रोन व सीसीटीव्हीचा कडेकोट बंदोबस्त

पुणे (प्रतिनिधी):- १ जानेवारी रोजी भीमा कोरेगाव येथे होणाऱ्या ऐतिहासिक विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यासाठी प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था उभारली असून, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी त्रिस्तरीय बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस दल पूर्णतः सज्ज झाले असून, तब्बल ७,२०० पोलीस अधिकारी व कर्मचारी सुरक्षा व्यवस्थेत सहभागी असणार आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.

अभिवादन सोहळ्यासाठी पुणे शहरातील ६,००० पोलीस आणि बाहेरील जिल्ह्यांतून मागविण्यात आलेले १,२०० पोलीस कर्मचारी तैनात असतील. यासोबतच १,००० होमगार्ड तसेच राज्य राखीव पोलीस दलाच्या (SRPF) तुकड्या देखील बंदोबस्तासाठी सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि संपूर्ण परिसरावर लक्ष ठेवण्यासाठी विशेष पोलीस टॉवर उभारण्यात आले आहेत. तसेच ड्रोनच्या माध्यमातून आकाशातून सतत देखरेख ठेवली जाणार आहे. चोरी, चेंगराचेंगरी किंवा अन्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी विशेष पोलिस पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.

भीम अनुयायांना कोणतीही अडचण होऊ नये यासाठी वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत. परिसरात २२ ठिकाणी प्रशस्त वाहनतळांची व्यवस्था करण्यात आली असून, वाहतूक पोलीस सतत परिस्थितीवर लक्ष ठेवणार आहेत.

नववर्षाच्या स्वागताच्या पार्श्वभूमीवर ३१ डिसेंबर रोजीही स्वतंत्र बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. फर्ग्युसन रोड, महात्मा गांधी रोड, नळस्टॉप चौक, हडपसर अमनोरा, चांदणी चौक यांसह शहरातील प्रमुख ठिकाणी नाकाबंदी केली जाणार आहे. या ठिकाणीही ड्रोनद्वारे पाळत ठेवली जाणार आहे.

शहरात ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ मोहीम अधिक तीव्र करण्यात आली असून ६० ठिकाणी नाकाबंदी करून मद्यपी वाहनचालकांची तपासणी सुरू आहे. मागील वर्षभरात सुमारे ६,५०० मद्यपी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आल्याची माहितीही पोलीस आयुक्तांनी दिली.

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीही विशेष प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात येत आहे. सराईत गुन्हेगारांकडून मतदारांवर दबाव येऊ नये, यासाठी गुन्हे शाखा व सातही पोलीस परिमंडळांमार्फत विशेष पथके कार्यरत आहेत.

तसेच सुमारे ५,००० सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली असून, पब, बिअर बार आणि मद्यविक्री दुकानांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याचे अमितेश कुमार यांनी स्पष्ट केले.

भीमा कोरेगाव अभिवादन सोहळा शांततेत, शिस्तबद्ध आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी प्रशासन पूर्ण ताकदीने सज्ज झाले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!