पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील दोन महिला अंमलदार विवाहबंधनात; ३० ऑगस्टला आळंदीत वैदिक पद्धतीने विवाह
पोलीस सेवेत जुळले नाते, आता आयुष्यभराची साथ देण्याचा निर्णय; लग्नपत्रिकेसह वरिष्ठांकडे रजेचा अर्ज

पिंपरी-चिंचवड पोलीस दलातील दोन महिला अंमलदार विवाहबंधनात; ३० ऑगस्टला आळंदीत वैदिक पद्धतीने विवाह
पोलीस सेवेत जुळले नाते, आता आयुष्यभराची साथ देण्याचा निर्णय; लग्नपत्रिकेसह वरिष्ठांकडे रजेचा अर्ज
पिंपरी-चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत कर्तव्य बजावणाऱ्या दोन महिला पोलीस अंमलदारांनी एकमेकींसोबत आयुष्याची साथ देण्याचा निर्णय घेतला आहे. दोघींनी आपल्या विवाह सोहळ्याची लग्नपत्रिका छापली असून, येत्या ३० ऑगस्ट २०२६ रोजी तीर्थक्षेत्र आळंदी येथे पारंपरिक वैदिक पद्धतीने विवाह सोहळा आयोजित केल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे पोलीस दलासह राज्यभरात या विवाहाची चर्चा सुरू झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पिंपरी-चिंचवड परिसरातील एकाच पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या या दोन्ही महिला अंमलदारांची पोलीस सेवेदरम्यान ओळख झाली. कर्तव्य बजावताना निर्माण झालेल्या मैत्रीचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले आणि आता त्यांनी एकत्र आयुष्य जगण्याचा निर्णय घेतला आहे.
लग्नपत्रिकेसह रजेचा अर्ज
या विवाह सोहळ्यासाठी दोन्ही महिला पोलीस कर्मचाऱ्यांनी रीतसर लग्नपत्रिका छापली आहे. ३० ऑगस्ट रोजी आळंदी येथील एका मंगल कार्यालयात विवाह सोहळा होणार असल्याचे लग्नपत्रिकेत नमूद करण्यात आल्याची माहिती आहे. विवाहासाठी रजा मिळावी यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे अर्ज सादरताना त्यांनी लग्नपत्रिकाही जोडल्याचे समजते.
पोलीस दलात निर्णयाची चर्चा
पोलीस दल हे शिस्त, कर्तव्य आणि कठोर नियमांसाठी ओळखले जाते. अशा वातावरणात कार्यरत असलेल्या दोन महिला कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक आयुष्याबाबत घेतलेला हा निर्णय सध्या पोलीस वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे. त्यांच्या निर्णयाबाबत विविध स्तरांतून कुतूहल व्यक्त केले जात आहे.
समाजातील पारंपरिक विवाहाच्या चौकटीपेक्षा वेगळा निर्णय घेत या दोन्ही महिलांनी ३० ऑगस्ट रोजी आळंदीत वैदिक पद्धतीने विवाह सोहळा करण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे हा विवाह सोहळा केवळ पोलीस दलातच नव्हे, तर सोशल मीडियावरही चर्चेत आला आहे.
कायदेशीर स्थितीबाबत महत्त्वाची बाब
दरम्यान, भारतात समलैंगिक जोडप्यांच्या विवाहाला कायदेशीर मान्यता देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने २०२३ मध्ये संसद आणि कार्यपालिकेच्या क्षेत्रातील विषय असल्याचे स्पष्ट केले होते. त्यामुळे या दोन्ही महिला आयोजित करत असलेला वैदिक विवाह सोहळा आणि त्याला मिळणारी कायदेशीर वैवाहिक मान्यता या दोन स्वतंत्र बाबी आहेत.
आळंदीत होणाऱ्या या सोहळ्याकडे आता पोलीस दलासह सर्वांचे लक्ष लागले आहे. दोन महिला पोलीस अंमलदारांनी घेतलेल्या या वैयक्तिक निर्णयामुळे प्रेम, स्वातंत्र्य आणि सामाजिक स्वीकार या विषयांवरही नव्याने चर्चा सुरू झाली आहे.



