उप प्रादेशिक परिवहन विभागाची ‘सडक सुरक्षा – जीवन रक्षा’ रॅली उत्साहात संपन्न
उप प्रादेशिक परिवहन विभागाची ‘सडक सुरक्षा – जीवन रक्षा’ रॅली उत्साहात संपन्न
*सोलापूर :- ‘हर घर तिरंगा अभियान-2026’ अंतर्गत देशभक्तीची भावना वाढविण्यासाठी तसेच नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षा आणि वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, सोलापूर यांच्या वतीने बुधवार दि. 13 ऑगस्ट 2026 रोजी भव्य रस्ता सुरक्षा रॅलीचे आयोजन करण्यात आले. ही रॅली उत्स्फूर्त सहभागातून यशस्वीरित्या पार पडली.
रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करणे, वाहनचालकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करणे आणि शिस्तबद्ध व सुरक्षित वाहनचालनाचे महत्त्व अधोरेखित करणे, हा या रॅलीचा मुख्य उद्देश होता.
रॅलीत प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे अधिकारी व कर्मचारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र सुरक्षा बल, विविध वाहनचालक संघटना, बाईकर्स ग्रुप आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. सहभागींनी तिरंगा हातात घेऊन देशभक्तीचा तसेच “सुरक्षित रहा, नियम पाळा” हा संदेश दिला.
• रॅलीचा मार्ग :•
प्रादेशिक परिवहन कार्यालय ते कंबर तलाव, सात रस्ता, रेल्वे स्टेशन, भैय्या चौक, रामलाल चौक, पार्क चौक, डफरीन चौक, रंगभवन, गांधी नगर, हॉटगी रोड, आसरा चौक, डी-मार्ट, दावत चौक, भारती विद्यापीठ ते पुन्हा प्रादेशिक परिवहन कार्यालय असा हा रॅलीचा मार्ग होता.
रॅलीदरम्यान वाहनचालकांनी हेल्मेटचा वापर, वाहनांची वैध कागदपत्रे बाळगणे आणि वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन केले. त्यामुळे नागरिकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत सकारात्मक संदेश गेला.

रॅलीचे उद्घाटन प्रादेशिक परिवहन अधिकारी गजानन नेरपगार आणि जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव अमोलकुमार देशपांडे यांच्या हस्ते करण्यात आले. “सडक सुरक्षा – जीवन रक्षा” या घोषणेसह रॅलीचा समारोप झाला.
ही रॅली प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. रॅली यशस्वी करण्यासाठी सर्व अधिकारी, कर्मचारी, संस्था आणि नागरिकांचे सहकार्य लाभले, अशी माहिती उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील यांनी दिली.



