बबलादचा हादरा झेडपीत पोहोचला! म्हेत्रेंचा हल्लाबोल, कल्याणशेट्टींचे प्रत्युत्तर; सभागृहात वातावरण तापले
जुन्या इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी; ‘शिवरत्न’ नामांतरापासून गणवेश खरेदीपर्यंत अनेक मुद्द्यांवर घमासान

बबलादचा हादरा झेडपीत पोहोचला! म्हेत्रेंचा हल्लाबोल, कल्याणशेट्टींचे प्रत्युत्तर; सभागृहात वातावरण तापले
जुन्या इमारतींच्या स्ट्रक्चरल ऑडिटची मागणी; ‘शिवरत्न’ नामांतरापासून गणवेश खरेदीपर्यंत अनेक मुद्द्यांवर घमासान
सोलापूर :- सोलापूर जिल्हा परिषदेची गुरुवारी (१३ ऑगस्ट) झालेली सर्वसाधारण सभा तब्बल साडेसहा तास रंगली. दुपारी २.३० वाजता सुरू झालेली सभा रात्री ८.४५ वाजता संपली. बबलाद येथील शाळेची दुर्घटना, धोकादायक शाळांच्या इमारती, अक्कलकोटमधील आरोग्य सेवकाच्या वारंवार बदल्या, कुर्डू येथील शेळ्यांच्या गोठ्यात भरणारी शाळा, आषाढी वारीचा ६१ कोटींचा खर्च, गणवेश खरेदी, ‘शिवरत्न’ सभागृहाचे नामांतर, जुन्या रजिस्टरचे डिजिटलायझेशन अशा विविध मुद्द्यांवर सदस्यांनी प्रशासनाला धारेवर धरले.

सभेच्या प्रारंभी राष्ट्रगीत व राज्यगीत झाले. त्यानंतर दिवंगतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांच्या अभिनंदनाचा ठरावही मांडण्यात आला.

अक्कलकोट तालुक्यातील बबलाद जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीचा गिलावा कोसळून विद्यार्थी जखमी झाल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद सभागृहात उमटले. शिवसेना शिंदे गटाचे सदस्य शिवराज म्हेत्रे यांनी प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

१८ मे २०२६ रोजी शाळेची इमारत नादुरुस्त असल्याबाबत प्रशासनाला कळविण्यात आले होते. त्यानंतर तीन वेळा पाठपुरावा करूनही दखल घेण्यात आली नाही, असा आरोप म्हेत्रे यांनी केला. निधी उपलब्ध नसल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात असताना सभेत १ कोटी ८३ लाख रुपये निधी शिल्लक असल्याची माहिती देण्यात आली. मग हा निधी कुठे आहे आणि धोकादायक शाळांच्या दुरुस्तीसाठी त्याचा वापर का झाला नाही, असा सवाल त्यांनी केला.

बबलाद दुर्घटनेप्रकरणी मुख्याध्यापक व केंद्रप्रमुखांवर करण्यात आलेली कारवाई चुकीची असून संबंधित ठेकेदार आणि गटशिक्षणाधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करून कारवाई करावी, अशी मागणीही म्हेत्रे यांनी केली.
यावेळी भाजपच्या सदस्या शांभवी कल्याणशेट्टी यांनी प्रशासनाची बाजू मांडली. बबलादची घटना दुर्दैवी आहे. मात्र, दुर्घटनेनंतर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दीपक वैद्य, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन आणि शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी तत्काळ घटनास्थळी व रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली. चौकशी पूर्ण होण्यापूर्वी प्रशासनाला वेठीस धरणे योग्य नाही, असे त्यांनी सांगितले. दोषी आढळणाऱ्यांवर निश्चितपणे कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी मांडली.

बबलाद दुर्घटनेनंतर जिल्ह्यातील शाळांसह जिल्हा परिषदेच्या अखत्यारितील जुन्या इमारतींच्या सुरक्षिततेचा प्रश्न सदस्यांनी उपस्थित केला. पृथ्वीराज माने यांनी ३५ वर्षांपेक्षा जुन्या शाळांच्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याची मागणी केली. हे काम पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून करून घेण्याची सूचनाही त्यांनी केली.
व्यंकटराव भालके यांनी स्ट्रक्चरल ऑडिटची माहिती सदस्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी केली. जिल्ह्यातील शाळा, अंगणवाड्या तसेच आरोग्य विभागाच्या इमारतींची तपासणी करण्याची मागणीही करण्यात आली.

अक्कलकोट तालुक्यातील शिरवळ आरोग्य केंद्रातील आरोग्य सेवक व्हटकर यांच्या बदलीचा विषयही चांगलाच गाजला. जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तानवडे यांनी प्रशासनाला धारेवर धरत, संबंधित कर्मचाऱ्याची वर्षभरात तीन वेळा बदली झाली आणि तरीही तो पुन्हा त्याच ठिकाणी कसा आला, असा सवाल केला.
“तो जिल्हा परिषदेचा जावई आहे का?” असा थेट सवाल तानवडे यांनी उपस्थित केला. या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन कारवाई करण्याचे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिले.
जिल्हा परिषदेच्या ‘शिवरत्न’ सभागृहाला ‘भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी सभागृह’ असे नाव देण्याचा ठराव सभेत मंजूर करण्यात आला. मात्र, अंतिम नामांतर शासनाच्या मार्गदर्शनानंतरच करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले.
माळशिरस तालुक्यातील सदस्य अर्जुनसिंह मोहिते-पाटील यांनी जिल्हा परिषदेला स्वतःहून सभागृहाचे नाव बदलण्याचा अधिकार आहे का, असा प्रश्न उपस्थित केला. ‘शिवरत्न’ हे नाव सर्वांच्या अस्मितेशी जोडलेले आहे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

यावर उपाध्यक्ष इंद्रजित पवार आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी नामांतराचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार असून शासनाच्या परवानगीशिवाय अंतिम निर्णय घेतला जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य अण्णासाहेब ढाणे यांनी कुर्डू येथील प्राथमिक शाळेचा धक्कादायक मुद्दा उपस्थित केला. स्वतंत्र इमारत नसल्याने शाळा शेळ्यांच्या गोठ्यात भरत असल्याचा आरोप त्यांनी केला. शिक्षक स्वतःच्या पगारातून खासगी जागा भाड्याने घेऊन शाळा चालवत असल्याचेही त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत त्यांनी तातडीने स्वतंत्र जागेची व्यवस्था करण्याची मागणी केली. शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार आणि समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते यांनी चर्चेत सहभाग घेत महिनाभरात जागेचा प्रश्न मार्गी लावण्याची सूचना केली.
नेताजी खंडागळे यांनी धोकादायक शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसवू नये आणि पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी केली.

दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी प्राथमिक शाळेत सुरक्षा व्यवस्था नसल्याने रात्री मद्यपींचा वावर असून धिंगाणा व जुगाराचे प्रकार सुरू असल्याचा गंभीर आरोप श्रुती भैरगुंडे यांनी केला. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. अनेक शाळांमध्ये स्वच्छतागृहे व पाण्याची सुविधा अपुरी असल्याचेही त्यांनी सांगितले.
सचिन जाधव यांनी शाळांना स्मार्ट टीव्ही आणि डिजिटल साधने उपलब्ध करून देण्याची मागणी केली.
आषाढी वारीच्या नियोजनासाठी शासनाकडून मंजूर झालेल्या ६१ कोटी रुपयांच्या निधीच्या खर्चाचा हिशोब सदस्य दादासाहेब लवटे यांनी मागितला. वारीदरम्यान खरेदी करण्यात आलेल्या औषधांचा खर्च, टेंडर प्रक्रिया आणि चष्मे वाटपाच्या मुद्द्यावर त्यांनी प्रश्न उपस्थित केले.
चष्मे वाटप प्रकरणाची चौकशी सुरू असल्याचे सीईओ कुशल जैन यांनी सांगितले. वारीसाठी तीन जिल्ह्यांसाठी औषध खरेदी करण्यात आल्याचे सांगून उर्वरित औषधे शासनाकडे परत पाठविण्याची प्रक्रिया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सांगोला तालुक्यात विद्यार्थ्यांना देण्यात आलेले गणवेश निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप दादासाहेब लवटे यांनी केला. महिला बचत गटांकडून गणवेश खरेदी करण्याचे आदेश असतानाही बाहेरील विक्रेत्यांकडून गणवेश खरेदी झाल्याचा आरोप त्यांनी केला.
गणवेशाचे बटन, चैन व माप योग्य नसल्याने विद्यार्थ्यांना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत चौकशी करून माहिती घेण्याचे आश्वासन देण्यात आले.

पृथ्वीराज माने यांनी १९५०, १९६१ आणि १९६७ पूर्वीच्या पुराव्यांसाठी आवश्यक असलेली जुनी जन्म-मृत्यू व शाळा रजिस्टर जीर्ण झाल्याचा मुद्दा मांडला. अनेक पाने फाटत असून नागरिकांना दाखले मिळविताना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावर सीईओ कुशल जैन यांनी जुन्या व जीर्ण रजिस्टरचे स्कॅनिंग करून डिजिटल स्वरूपात जतन करण्याचे आश्वासन दिले.

चरण चवरे यांनी सदस्यांना निधी उपलब्ध होत नसल्याची खंत व्यक्त केली. ग्रामपंचायतीत असताना कामे करता येत होती; मात्र जिल्हा परिषदेत आल्यानंतर एक रस्ता किंवा एक बल्बही बसवता आला नाही, अशी नाराजी त्यांनी व्यक्त केली.
सोनाली कडते यांनी प्रशासक काळातील निधी खर्चाची माहिती देण्याची मागणी केली. अण्णा भोसले यांनी जिल्हा परिषद सदस्यांसाठी मेडिक्लेम व विमा योजना सुरू करण्याची मागणी केली.
सभेदरम्यान आरोग्य विभागाच्या प्रश्नावर विभागप्रमुखाऐवजी कर्मचाऱ्याने उत्तर दिल्याने सभागृहात काही काळ गोंधळ निर्माण झाला. आदिनाथ देशमुख यांनी आरोग्य विभागाशी संबंधित प्रश्न उपस्थित केला असता अपेक्षित अधिकाऱ्याऐवजी फार्मासिस्ट पुजारी यांनी उत्तर दिल्याने सदस्य व कर्मचाऱ्यामध्ये शाब्दिक वाद झाला.
हा प्रकार सभेच्या शिरस्त्याला धरून आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला. आरोग्य व शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांनी संबंधित कर्मचाऱ्याला सुनावल्याचे सांगण्यात आले.
सुमारे साडेसहा तास चाललेल्या सभेत अनेक सदस्यांनी विविध विभागांचे प्रश्न एकाचवेळी उपस्थित केले. त्यामुळे कामकाजात वारंवार व्यत्यय आला. काही प्रश्नांवर अधिकाऱ्यांकडून ‘माहिती घेतो’, ‘अहवाल मागवतो’, ‘सूचना देतो’, ‘कारवाई करतो’ अशी उत्तरे देण्यात आली.

अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य सभापती चेतनसिंह केदार, कृषी व पशुसंवर्धन सभापती रामप्पा चिवडशेट्टी, समाजकल्याण सभापती संस्कृती सातपुते, महिला व बालकल्याण सभापती अॅड. अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
सभेचे कामकाज जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले यांनी पाहिले. प्रशासन विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांच्या बदलीनंतर संबंधित पदाचा अतिरिक्त कार्यभार सूर्यकांत भुजबळ यांच्याकडे असल्याचे सांगण्यात आले.
अशा प्रकारे बबलाद दुर्घटनेपासून ते शाळांच्या सुरक्षेपर्यंत, आरोग्य विभागातील बदल्यांपासून आषाढी वारीच्या खर्चापर्यंत आणि ‘शिवरत्न’ सभागृहाच्या नामांतरापासून जुन्या रजिस्टरच्या डिजिटलायझेशनपर्यंत अनेक प्रश्नांवर झालेल्या चर्चेमुळे गुरुवारची जिल्हा परिषद सर्वसाधारण सभा चांगलीच गाजली.



