तांदुळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क; अपघातप्रवण महामार्गांवर तातडीच्या उपाययोजनांचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
आठ जणांच्या मृत्यूनंतर जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांची घटनास्थळी पाहणी; चौकशी समिती स्थापन, दोषींवर कारवाईचे संकेत

तांदुळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासन सतर्क; अपघातप्रवण महामार्गांवर तातडीच्या उपाययोजनांचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश
आठ जणांच्या मृत्यूनंतर जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांची घटनास्थळी पाहणी; चौकशी समिती स्थापन, दोषींवर कारवाईचे संकेत
पंढरपूर :- पंढरपूर – सातारा महामार्गावरील तांदुळवाडी परिसरात झालेल्या भीषण अपघातानंतर प्रशासनाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. महामार्गालगत असलेल्या अपघातप्रवण ठिकाणांवर तात्काळ सुरक्षा उपाययोजना राबविण्याचे निर्देश जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांनी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाला दिले आहेत. तसेच रस्त्याच्या कामाची गुणवत्ता, भूसंपादनानुसार झालेली अंमलबजावणी आणि सुरक्षा सुविधांची चौकशी करण्यासाठी विशेष समितीची स्थापना करण्यात आली आहे.

रविवारी (दि. १४ जून) तांदुळवाडी (ता. माळशिरस) परिसरात टेम्पो चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने वाहन रस्त्यालगतच्या विहिरीत कोसळून आठ भाविकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांनी सोमवारी घटनास्थळी भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली.
यावेळी प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजुळ, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे उपअभियंता पी. एस. राऊत, विविध विभागांचे अधिकारी तसेच स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.
पाहणीदरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गालगत असलेल्या तीन धोकादायक विहिरींची पाहणी करून त्यांच्या सुरक्षेसाठी तातडीने संरक्षक भिंती व कठडे उभारण्याचे आदेश दिले. तसेच अपघातप्रवण क्षेत्रांमध्ये कायमस्वरूपी सुरक्षा व्यवस्था निर्माण करण्यासाठी व्यापक आराखडा तयार करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
जिल्हाधिकारी कार्तीकेयन एस. यांनी सांगितले की, महामार्गाच्या कामात कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा किंवा निकृष्ट दर्जाचे काम झाले असल्यास त्याची सखोल चौकशी करण्यात येईल. रस्त्याची रुंदी, भूसंपादनानुसार झालेले काम, पुलांची गुणवत्ता, सुरक्षा कठडे, लोखंडी बॅरिकेड्स, रिफ्लेक्टर, गतिरोधक आणि प्रकाशव्यवस्था यांची तपासणी करण्यात येणार आहे. चौकशी समितीच्या अहवालानुसार दोषी आढळणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी स्थानिक ग्रामस्थांनी प्रशासनाकडे अनेक गंभीर बाबी निदर्शनास आणून दिल्या. तांदुळवाडी परिसरात वारंवार अपघात होत असल्याचा दावा करत त्यांनी महामार्गाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप केला. तसेच भूसंपादनानुसार रस्त्याचे काम पूर्ण झाले नसल्याचे सांगत उघडे पुलाजवळ सतत खड्डे पडत असल्याने भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली. संबंधित पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट करून दोषी ठेकेदारांवर कारवाई करावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी केली.
पाहणीच्या शेवटी जिल्हाधिकाऱ्यांनी महामार्गालगतच्या विहिरी, उघडे पूल आणि इतर धोकादायक ठिकाणांची प्रत्यक्ष तपासणी करून संबंधित विभागांना तातडीने आवश्यक कार्यवाही करण्याचे निर्देश दिले. तांदुळवाडी दुर्घटनेनंतर प्रशासनाने घेतलेल्या या भूमिकेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.



