आषाढी वारीच्या औषध खरेदीला ११ कोटींची घाईघाईत मंजुरी; जिल्हा परिषद सभेत उपाध्यक्ष इंद्रजित पवार ठरले समन्वयक
अजेंड्यावर नसलेला विषय ऐनवेळी मंजूर; सदस्यांच्या नाराजीवर पवारांची मध्यस्थी, “प्रत्येकाला समान न्याय व निधी”ची ग्वाही

आषाढी वारीच्या औषध खरेदीला ११ कोटींची घाईघाईत मंजुरी; जिल्हा परिषद सभेत उपाध्यक्ष इंद्रजित पवार ठरले समन्वयक
अजेंड्यावर नसलेला विषय ऐनवेळी मंजूर; सदस्यांच्या नाराजीवर पवारांची मध्यस्थी, “प्रत्येकाला समान न्याय व निधी”ची ग्वाही
सोलापूर जिल्हा परिषदेत पहिलीच सर्वसाधारण सभा गाजली
सोलापूर :- सोलापूर जिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील पहिली सर्वसाधारण सभा शुक्रवारी विविध कारणांनी गाजली. अध्यक्ष दीपक वैद्य यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत आषाढी वारीसाठी तब्बल ११ कोटी रुपयांच्या औषध खरेदीला मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे हा विषय मूळ अजेंड्यावर नसताना ऐनवेळी “आयत्या वेळेचा विषय” म्हणून सभेत आणण्यात आला आणि कोणतीही मोठी चर्चा न होता एकमताने मंजूर करण्यात आला.

या औषध खरेदीसाठी सेस फंडातून १ कोटी रुपये तर जिल्हा वार्षिक योजना आणि अन्य निधीतून तब्बल १० कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले. सभेपूर्वी आषाढी वारीसाठी आरोग्य विभागाने कोणतीही तयारी केली नसल्याचा मुद्दा गाजत असतानाच सभेत हा विषय अचानक मंजुरीसाठी आणल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या.
आषाढी वारी अवघ्या काही दिवसांवर आली असताना लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आवश्यक औषधसाठा, वैद्यकीय पथके, उष्माघात प्रतिबंधक उपाययोजना, साथीच्या रोगांवरील नियंत्रण, मोबाइल आरोग्य सेवा याबाबत मूळ अजेंड्यावर एकही विषय नव्हता. त्यामुळे आरोग्य विभागावर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते.
दरम्यान, सभेत आयत्या वेळेच्या विषयात अत्यावश्यक औषध खरेदीचा प्रस्ताव घाईघाईत मांडण्यात आला. मात्र या प्रस्तावात सुरुवातीला “आषाढी वारी”चाच उल्लेख राहून गेला. त्यामुळे काही काळ सभागृहात संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. अखेर जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दुरुस्ती सुचवल्यानंतर आषाढी वारीचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आणि त्यानंतरच प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
सभागृहात या घाईघाईच्या प्रक्रियेबाबत चर्चा रंगली. विशेष म्हणजे सभेपूर्वी आरोग्य विभागाच्या निष्क्रियतेवर जोरदार चर्चा होईल, अशी अपेक्षा असताना कोणत्याही सदस्याने या विषयावर आक्रमक भूमिका घेतली नाही. उलट ऐनवेळी प्रस्ताव मंजूर झाल्याने संपूर्ण प्रक्रिया “पूर्वनियोजित” असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली.
• १२ मूळ विषयांपेक्षा ‘आयत्या वेळेचे’ २० विषय ठरले महत्त्वाचे •
सभेच्या अधिकृत अजेंड्यावर १२ विषय होते. त्यामध्ये अंदाजपत्रक, दिव्यांग योजना, शेळीगट योजना, ई-बाईक योजना, अंगणवाडी साहित्य, रस्ते विकास, हातपंप साहित्य खरेदी, धोकादायक इमारती पाडणे, ग्रामीण मार्ग दर्जा वाढविणे आदी विषयांचा समावेश होता.
मात्र प्रत्यक्षात सभेत “आयत्या वेळेच्या” तब्बल २० विषयांवर भर देण्यात आला. यामध्ये पशुसंवर्धन, कृषी, बांधकाम, शिक्षण, ग्रामपंचायत आणि आरोग्य विभागातील कोट्यवधी रुपयांच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली.
विशेष म्हणजे ,प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी अत्यावश्यक औषध खरेदी, उपकेंद्रांसाठी औषधी व साहित्य खरेदी, वीज, पाणी, इंधन खर्च मंजुरी, डोणगाव येथे आरोग्य केंद्र स्थलांतर, गुळवंची येथे नवीन,उपकेंद्र इमारत मंजुरी
अशा महत्त्वाच्या आरोग्य विषयांवर सविस्तर चर्चा न करताच ठराव मंजूर करण्यात आल्याचे चित्र दिसून आले.
• विरोधी पक्षनेत्याविना सभा; चर्चा अनेकदा भरकटली •
तब्बल तीन तास चाललेल्या या सभेत शिक्षण, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, महावितरण, शिक्षकांची कमतरता, ट्रान्सफॉर्मर समस्या, पाणीटंचाई, जिल्हा परिषदेचे उत्पन्न वाढविणे अशा विविध विषयांवर चर्चा झाली.
मात्र विरोधी पक्षनेता नसल्याने अनेक वेळा चर्चा भरकटल्याचे दिसून आले. काही सदस्यांनी विभागीय अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली तर काहींनी महायुतीतील समन्वयाच्या मुद्द्यावर आवाज उठवला.

सभागृह नेत्या रश्मी बागल यांनी हस्तक्षेप करून चर्चा आटोपती घेण्याचे आवाहन केले. याचवेळी उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी मध्यस्थीची भूमिका घेत सभागृहातील वातावरण शांत केले.
• “प्रत्येक सदस्याला समान न्याय देऊ” – उपाध्यक्ष इंद्रजीत पवार •
सभेदरम्यान मित्रपक्ष सदस्यांनी आम्ही सत्तेसोबत असूनही सन्मानाची वागणूक मिळत नसल्याची नाराजी व्यक्त केली. विषय समित्यांवरील नियुक्त्यांमध्ये विश्वासात घेतले नसल्याचा आरोपही करण्यात आला.

यावेळी उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी परिस्थिती हाताळत समन्वयकाची भूमिका बजावली.
“कोणताही सदस्य नाराज होणार नाही. प्रत्येक सदस्याचे प्रश्न सोडविले जातील. सर्वांना समान न्याय आणि समान निधी देण्याचा प्रयत्न करू,” असे आश्वासन त्यांनी दिले.
त्यांच्या या भूमिकेनंतर सभागृहातील वातावरण काहीसे निवळले. पुढील सभेत प्रत्येक विषयावर सविस्तर चर्चा घेण्यात येईल तसेच आठ दिवस आधी लेखी माहिती उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी प्रशासनाला दिल्या.
सभेच्या सुरुवातीला दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सांगोल्याचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचे वडील पोपट देशमुख यांच्या निधनाबद्दल श्रद्धांजली वाहण्यात आली.
यानंतर प्रवीण तानवडे यांनी राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्याबद्दल प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. पृथ्वीराज माने यांनी जिल्हा परिषदेला पुरस्कार मिळवून दिल्याबद्दल तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांचे अभिनंदन केले.
वित्त व लेखाधिकारी मीनाक्षी वाकडे यांनी सन २०२६-२७ चे अंदाजपत्रक सादर केले. मात्र त्यावर कोणतीही सखोल चर्चा न होता अंदाजपत्रक मंजूर करण्यात आले.
• जिल्हा परिषद उत्पन्न वाढीसाठी व्यापारी संकुलाचा प्रस्ताव •
उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांच्या सूचनेनंतर बोरामणी गटाचे सदस्य नेताजी खंडागळे यांनी जिल्हा परिषद आवारातील जागेवर व्यापारी संकुल उभारण्याचा प्रस्ताव मांडला.
माढा तालुक्यातील सदस्य पृथ्वीराज सावंत यांनी माढा चौकात व्यावसायिक गाळे उभारण्याची सूचना केली. माथाडी प्रतिनिधी अतुल पवार यांनी गाळे बांधणे शक्य नसल्यास जागा भाडेतत्त्वावर देण्याचा पर्याय सुचवला.
सभेत जिल्हा परिषदेमधील रिक्त पदे भरणे, शाळांमध्ये शिपाई नेमणे, प्रत्येक तालुक्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध करणे, नेहरू वसतिगृहातील स्वच्छता, पंढरपूर वसतिगृह पुन्हा सुरू करणे अशा विषयांवर चर्चा झाली.
पंढरपूर येथील वसतिगृह कोरोना काळापासून बंद असल्याचा मुद्दा सदस्यांनी उपस्थित केला. दुरुस्तीअभावी आणि प्रवेशसंख्या घटल्याने वसतिगृह बंद असल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. नव्या शैक्षणिक वर्षापासून ते सुरू करण्याची मागणी सदस्यांनी केली.
• आषाढी वारी नियोजनावर प्रशासन सज्ज असल्याचा दावा •
सभागृह नेत्या रश्मी बागल यांनी आषाढी वारीच्या नियोजनाचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर यांनी जर्मन हँगर, पाणीपुरवठा, शौचालये, मोबाइल टॉयलेट, स्वच्छता सुविधा आदी तयारी सुरू असल्याचे सांगितले.
शेगावहून येणाऱ्या गजानन महाराज पालखीच्या स्वागतासाठी उळे येथे आवश्यक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी नेताजी खंडागळे यांनी केली.
सभेदरम्यान ग्रामीण भागातील भारनियमन, ट्रान्सफॉर्मर समस्या, कृषी विभागाच्या कारभारावर सदस्यांनी प्रश्न उपस्थित केले. कृषी अधीक्षकांनी स्वतः उपस्थित न राहता तंत्रज्ञ पाठवल्याबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.
पशुसंवर्धन विभागाच्या योजनांवर तसेच ग्रामीण भागातील सेवा व्यवस्थेवरही सदस्यांनी प्रश्न उपस्थित करत अधिकाऱ्यांना कोंडीत पकडले.
या सभेला अध्यक्ष दीपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार, सभागृह नेत्या रश्मी बागल, चेतनसिंह केदार, रामप्पा चिवडशेट्टी, संस्कृती सातपुते, अॅड. अमृता वाघे, नेताजी खंडागळे, पृथ्वीराज सावंत, अतुल पवार यांच्यासह मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहीनकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रशेखर जगताप, सूर्यकांत भुजबळ, प्रसाद मिरकले बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी व नरेंद्र खराडे उपस्थित होते. सभेचे कामकाज उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील यांनी पाहिले.



