महाराष्ट्र

“एक गाव-एक स्मशानभूमी” संकल्पना पुढे; राज्यस्तरीय बैठकीत महत्त्वाचे निर्णय

आमदार देवेंद्र कोठे यांचा सक्रिय सहभाग; स्मशानभूमी सुधारणा उपक्रमांना गती

“एक गाव-एक स्मशानभूमी” संकल्पना पुढे; राज्यस्तरीय बैठकीत महत्त्वाचे निर्णय

आमदार देवेंद्र कोठे यांचा सक्रिय सहभाग; स्मशानभूमी सुधारणा उपक्रमांना गती

सोलापूर (प्रतिनिधी):- राज्यातील स्मशानभूमींचा सर्वांगीण विकास, आधुनिकीकरण आणि सामाजिक समतेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण निर्णय घेत राज्य शासनाने “एक गाव-एक स्मशानभूमी” ही संकल्पना पुढे आणण्याचा विचार सुरू केला आहे. याच अनुषंगाने मुंबई येथील मंत्रालयात महाराष्ट्र राज्याच्या स्मशानभूमी समितीची पहिली राज्यस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत समितीचे सदस्य म्हणून आमदार देवेंद्र कोठे यांनी सहभाग नोंदविला.

बैठकीदरम्यान ग्रामविकास मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देत, राज्यातील ज्या ठिकाणी विकासकामांची मागणी होईल, त्या ठिकाणी स्मशानभूमी उभारणीस प्राधान्य द्यावे, असे सांगितले. तसेच प्रत्येक गावात सर्व समाज घटकांसाठी एक मुख्य सार्वजनिक स्मशानभूमी असणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

राज्यातील विद्यमान स्मशानभूमींची स्थिती, त्यांचे अद्ययावतीकरण, तसेच परिसर सुशोभीकरणासाठी सखोल अभ्यास करण्यासाठी राज्यस्तरीय अभ्यास समिती गठीत करण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. ही समिती राज्यातील विविध जिल्ह्यांचा दौरा करून प्रत्यक्ष पाहणी करणार असून, त्यानंतर निष्कर्षांवर आधारित सविस्तर अहवाल शासनाकडे सादर केला जाणार आहे.

यावेळी हिंदू समाजातील दहनभूमी व दफनभूमी या विषयावर अभ्यास करण्याचा निर्णय घेण्यात आला. ग्रामीण भागातील सामाजिक सलोखा आणि एकात्मता वाढविण्याच्या दृष्टीने सर्व हिंदू स्मशानभूमी सर्व जातीच्या नागरिकांसाठी खुल्या करण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला असून, त्यावर अभ्यास करून ठोस उपाययोजना सुचविण्यात येणार आहेत.

स्मशानभूमीमध्ये पाणी, वीज, वृक्षलागवड, छत, आरसीसी बांधकाम, बसण्यासाठी बाकडे, पोहोच रस्ता तसेच महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र शौचालय अशा मूलभूत सुविधांची उपलब्धता सुनिश्चित करण्यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला.

या महत्त्वपूर्ण बैठकीस मंत्री जयकुमार गोरे, प्रधान सचिव (ग्रामविकास) एकनाथ डवले, आमदार देवेंद्र कोठे, अशोक राणे, ऋषिकेश सकनूर, ॲड. गुरदीप सिंह अहलुवालिया, श्रीमती अश्विनी चव्हाण, जयवंत तांबे तसेच इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.

दरम्यान, आमदार देवेंद्र कोठे यांनी सांगितले की, राज्यातील स्मशानभूमींची स्थिती सुधारण्यासाठी आणि नागरिकांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या स्मशानभूमी समितीमार्फत सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या उपक्रमांचा लाभ सर्वसामान्य जनतेला निश्चितपणे होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!