वृक्षारोपणातून आईला अनोखी श्रद्धांजली; मुंढे परिवाराचा पर्यावरणपूरक निर्णय
नदीत विसर्जन टाळून शेतात वटवृक्ष; मुंढे परिवाराचा विवेकवादी निर्णय
वृक्षारोपणातून आईला अनोखी श्रद्धांजली; मुंढे परिवाराचा पर्यावरणपूरक निर्णय
नदीत विसर्जन टाळून शेतात वटवृक्ष; मुंढे परिवाराचा विवेकवादी निर्णय
बीड (प्रतिनिधी) :- पारंपरिक पद्धतींना बाजूला ठेवत मुंढे परिवाराने आपल्या आईच्या स्मृतीप्रित्यर्थ एक वेगळी आणि विचारपूर्वक वाट निवडत समाजासमोर आदर्श निर्माण केला आहे. अस्थींचे नदीत विसर्जन न करता त्या शेतात विसर्जित करून त्याठिकाणी वडाचे झाड लावण्याचा संवेदनशील निर्णय कुटुंबाने घेतला.
“निसर्ग हाच सृष्टीचा निर्माता आणि सर्वोच्च शक्ती आहे. त्याचे रक्षण आणि संवर्धन करणे हीच खरी श्रद्धांजली,” या विचारातून प्रेरणा घेत हा निर्णय घेण्यात आल्याचे परिवाराने स्पष्ट केले.

मुंढे कुटुंबातील सर्व भाऊ आपल्या आईला प्रेमाने “बाई” असे संबोधत असत, तर गावकरी आणि आप्तेष्टांमध्ये त्या “जीजी” म्हणून ओळखल्या जात. त्यांच्या स्मृती चिरंतन राहाव्यात, त्यांच्या मायेची सावली पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने वडाचे झाड लावण्यात आले. हा वटवृक्ष भविष्यात “बाईंच्या” मायेचे आणि आशीर्वादाचे प्रतीक ठरेल, अशी भावना कुटुंबीयांनी व्यक्त केली.

यासोबतच, दहावा-तेरवा यांसारख्या पारंपरिक विधींनाही मुंढे परिवाराने नकार देत विवेकवाद आणि विज्ञानाला प्राधान्य दिले. सामाजिक उपयुक्तता आणि पर्यावरण संरक्षण हाच खरा धर्म असल्याचे त्यांनी नमूद केले.
आजच्या आधुनिक युगात पर्यावरण संवर्धनाची गरज अधोरेखित करत, अशा प्रकारच्या कृतीतून समाजाला नवा संदेश देण्याचा प्रयत्न या कुटुंबाने केला आहे. त्यांच्या या निर्णयाचे अनेक स्तरातून कौतुक होत असून, पारंपरिक श्रद्धांना पर्यावरणपूरक पर्याय देणारा हा उपक्रम ठरत आहे.
मुंढे परिवाराने समाजाकडे आवाहन करत, “आमच्या या निर्णयाचा आदर करावा आणि ‘बाईंच्या’ आठवणी मनात जपून ठेवाव्यात,” अशी नम्र विनंती केली आहे.



