सोलापुरात आयकर विभागाचा ‘मेगा अॅक्शन’: सात बड्या व्यावसायिकांवर एकाचवेळी धाडी; गोपनीय डायऱ्या, व्यवहारांची कागदपत्रे जप्त
सोलापूरात आयकर विभागाचा मोठा शर्ट ऑपरेशन; ७ उद्योगपतींच्या १२ ठिकाणी १७ तास चालली चौकशी
सोलापूर(प्रतिनिधी):-
शहरातील अवैध आर्थिक व्यवहार, करचोरी आणि रिअल इस्टेटमधील संशयास्पद गुंतवणुकींच्या तपासासाठी आयकर विभागाने बुधवारी पहाटे सोलापूरात धडाकेबाज कारवाई केली. सूर्योदयाआधीच शहरातील सात प्रतिष्ठित व्यक्तींच्या घरे, दुकाने आणि व्यवसायीक आस्थापनांवर केलेल्या धाडीत महत्त्वाची कागदपत्रे, गोपनीय हिशेबाच्या डायऱ्या आणि व्यवहारांची माहिती जप्त करण्यात आली.ही कारवाई सराफ व्यापारी गणेश आपटे, त्यांचे भागीदार वेणेगुरकर आणि कोळी, मनोज शहा (हेरिटेज), समीर गांधी (किमया कन्स्ट्रक्शन), नारायणपेठकर, तसेच अॅड. उमेश मराठे यांच्या विविध आस्थापनांवर करण्यात आली.

तीर्थयात्रेचे स्टिकर्स लावून ३५ गाड्यांतून ९० अधिकारी सोलापुरात दाखल
मिळालेल्या माहितीनुसार, कोल्हापूर, पुणे आणि छत्रपती संभाजीनगर येथील आयकर विभागातील तब्बल ९० अधिकाऱ्यांनी मंगळवारी रात्री कर्नाटकातील विजयपूर येथे मुक्काम केला होता.पहाटे ३ वाजता तीर्थयात्रेचे स्टिकर्स लावलेल्या ३५ गाड्यांनी सोलापूरकडे प्रयाण केले आणि सकाळी ६ वाजता सात जणांच्या १२ ठिकाणी एकाचवेळी धाडी टाकण्यात आल्या.या कारवाईदरम्यान शहर पोलिस दलातील २५ जवान आयकर पथकासोबत होते.
१७ तासांची चौकशी; बाहेरील व्यक्तींना प्रवेश बंदी
धाडी सुरू झाल्यानंतर दुकाने, घरे व कार्यालयांमध्ये कोणालाही प्रवेश दिला गेला नाही.
अधिकाऱ्यांनी व्यवहारांची तपासणी करताना:
गोपनीय,डायऱ्या,बिननोंदणी हिशेब,आठ वर्षांतील व्यवहारांची कागदपत्रे जप्त केली.संपूर्ण प्रक्रिया व्हिडिओ रेकॉर्डिंगसह पार पडली.
धाडीची माहिती मिळताच दोन व्यावसायिकांनी आपापल्या सीएला तातडीने बोलावले; परंतु
अधिकाऱ्यांनी त्यांना बाहेरच थांबवले, अशी माहिती सूत्रांनी दिली.गोपनीय स्वरूपाचे कागदपत्रे हाती लागल्याने गुरुवारीही चौकशी सुरू राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आपटे समूहावर विशेष लक्ष; रिअल इस्टेट व्यवहारांची तपासणी
सराफ बाजारातील गणेश रामचंद्र आपटे यांच्या दुकानांसह पुण्यातील आणि सोलापुरातील सर्व आस्थापनांवर अधिकाऱ्यांनी ठाण मांडले.आपटे हे रिअल इस्टेट क्षेत्रातही सक्रिय असून त्यांचे वेणेगुरकर आणि कोळी यांच्यासोबत संयुक्त व्यवसाय असल्याने त्यांचे मागील सात-आठ वर्षांचे व्यवहार तपासले गेले.
समीर गांधी यांच्या घरात विवाहसोहळा; धाडीमुळे निर्माण तणाव
किमया कन्स्ट्रक्शनचे समीर गांधी यांच्या घरी रविवारी विवाहसोहळा असून, अचानक झालेल्या धाडीमुळे कुटुंबीयांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले.
अधिकाऱ्यांच्या सुरक्षेसाठी जेवण व्यवस्थेमध्येही गोपनीयता
धाडीवेळी अधिकारी कोण, कुठून आले, कुठे मुक्काम आहेत याची माहिती बाहेर जाऊ नये म्हणून जेवण आणि सुविधा पुरवणाऱ्यांचीही अदलाबदल केली गेली.दुपारी राइस-प्लेट व रात्री साधे जेवण अशी व्यवस्था खासगी वाहनांतून करण्यात आली.
करचोरी रिअल इस्टेट आणि सोन्या-चांदीतून?
उच्चस्तरीय आयकर अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार,
शहरातील काही व्यापारी समोर दिसणाऱ्या व्यवसायाच्या आडून:
रिअल इस्टेट,सोने व दागिने व्यापार
यांद्वारे काळा पैसा फिरवतात.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसारच ही कारवाई आखण्यात आली.
या धाडीनंतर सोलापूरातील व्यापारी वर्गात आणि सराफ बाजारात तीव्र चर्चांचा भडका उडाला आहे.
जप्त कागदपत्रे आणि बिननोंदणी व्यवहारांचा तपशील मोठा असल्याचे समजत असून
अजून काही ठिकाणी धाडी पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.



