मनोरंजन

अक्कलकोटमध्ये २९ सप्टेंबरपासून विवेकानंद प्रतिष्ठानची १४ वी गणेशोत्सव व्याख्यानमाला

विनोदी नाटक, काव्यसफर, राष्ट्रभक्तीचा जागर अन् मेळघाटातील आरोग्यदूतांशी संवाद; रसिकांसाठी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी

अक्कलकोटमध्ये २९ सप्टेंबरपासून विवेकानंद प्रतिष्ठानची १४ वी गणेशोत्सव व्याख्यानमाला

विनोदी नाटक, काव्यसफर, राष्ट्रभक्तीचा जागर अन् मेळघाटातील आरोग्यदूतांशी संवाद; रसिकांसाठी वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची मेजवानी

अक्कलकोट : गणेशोत्सवाच्या निमित्ताने बौद्धिक, सांस्कृतिक आणि सामाजिक प्रबोधनाला चालना देण्यासाठी विवेकानंद प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही १४ व्या गणेशोत्सव व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. २९ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या कालावधीत प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन, अक्कलकोट येथे दररोज सायंकाळी साडेसहा वाजता विविध कार्यक्रम सादर होणार आहेत.

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शन व प्रेरणेतून ही व्याख्यानमाला आयोजित करण्यात येत असल्याची माहिती महर्षी विवेकानंद समाजकल्याण संस्थेचे ज्येष्ठ संचालक तथा विवेकानंद प्रतिष्ठानचे मार्गदर्शक मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी पत्रकार परिषदेत दिली. गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक कार्यक्रमांपुरते मर्यादित न राहता समाजात साहित्यिक, सांस्कृतिक आणि बौद्धिक विचारांची देवाणघेवाण व्हावी, या उद्देशाने विविध कार्यक्रमांची आखणी करण्यात आली आहे.

• सहा दिवस, सहा वेगवेगळे कार्यक्रम •

व्याख्यानमालेच्या पहिल्या दिवशी, २९ सप्टेंबर रोजी अभिनेते सागर कारंडे यांचे ‘शिक्कामोर्तब’ हे तुफान विनोदी नाटक सादर केले जाणार आहे. त्यानंतर ३० सप्टेंबर रोजी ‘मर्मबंधातील ठेव’ या कार्यक्रमातून भावगीते, भक्तिगीते आणि चित्रपट गीतांची सुरेल मैफल रंगणार आहे.

१ ऑक्टोबर रोजी सुप्रसिद्ध कवयित्री गुंजन पाटील यांच्या ‘जाऊ कवितांच्या गावा’ या काव्यात्मक सफरीचा अनुभव रसिकांना घेता येणार आहे. तर २ ऑक्टोबर रोजी माधव देशपांडे हे पद्मश्री डॉ. रवींद्र कोल्हे व पद्मश्री डॉ. स्मिता कोल्हे यांच्याशी ‘मेळघाटातील आरोग्यदूत’ या विषयावर संवाद साधणार आहेत.

३ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील नामवंत व्याख्याते स्वानंद बेदरकर ‘वंद्य वंदे मातरम्’ या विषयातून राष्ट्रभक्तीचा जागर करणार आहेत. व्याख्यानमालेच्या समारोपाच्या दिवशी, ४ ऑक्टोबर रोजी नितीन वाघ व सहकारी ‘स्वातंत्र्यवीर’ या विषयावर सांगितिक अभिवाचनाचा प्रयोग सादर करणार आहेत.

विवेकानंद प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून विविध समाजोपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. त्याच परंपरेत यंदाच्या गणेशोत्सव व्याख्यानमालेत मनोरंजनासोबतच साहित्य, संगीत, राष्ट्रभक्ती, सामाजिक कार्य आणि प्रबोधन यांचा सुरेख संगम साधण्यात आला आहे.

या वैविध्यपूर्ण कार्यक्रमांचा अक्कलकोटमधील रसिकांनी मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन मल्लिनाथ कल्याणशेट्टी यांनी केले.
यावेळी अशोक येणगुरे, मनोज कल्याणशेट्टी, मल्लिनाथ मसुती, संतोष जिरोळे, चंद्रकांत दसले, गुरुपादप्पा आळगी आदी उपस्थित होते.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!