सोलापुरातील खासगी रुग्णालयांमध्ये ‘बोगस नर्स’चा धक्कादायक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप
छावा संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; १५ दिवसांत कारवाई न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा

सोलापुरातील खासगी रुग्णालयांमध्ये ‘बोगस नर्स’चा धक्कादायक प्रकार; रुग्णांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचा आरोप
छावा संघटनेची जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार; १५ दिवसांत कारवाई न झाल्यास जनआंदोलनाचा इशारा
सोलापूर :- शहरासह जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय शिक्षण व अधिकृत नोंदणी नसलेल्या महिलांकडून नर्सची कामे करून घेतली जात असल्याचा गंभीर आरोप राष्ट्रीय छावा संघटनेने केला आहे. या प्रकारामुळे रुग्णांच्या जीविताला धोका निर्माण होत असून संबंधित रुग्णालयांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
राष्ट्रीय छावा संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष अॅड. योगेश पवार यांनी जिल्हाधिकारी, सिव्हिल सर्जन आणि महापालिका आरोग्य विभागाकडे यासंदर्भात लेखी तक्रार दाखल केली आहे. तक्रारीत जिल्ह्यातील सर्व खासगी रुग्णालयांची विशेष तपासणी मोहीम राबवून पात्रता नसलेल्या व्यक्तींना नर्स म्हणून कामावर ठेवणाऱ्या रुग्णालयांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
नर्सिंग व्यवसायासाठी एएनएम (ANM), जीएनएम (GNM), बी.एस्सी. नर्सिंग किंवा पोस्ट बेसिक बी.एस्सी. नर्सिंग यांसारखी शैक्षणिक पात्रता आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक असते. मात्र, अनेक रुग्णालयांमध्ये या निकषांचे पालन होत नसल्याचा आरोप करण्यात आला आहे.
तक्रारीनुसार, काही रुग्णालयांमध्ये अपात्र व अप्रशिक्षित महिलांकडून इंजेक्शन देणे, सलाईन लावणे, ड्रेसिंग करणे, रुग्णांची देखभाल करणे आणि औषधोपचाराशी संबंधित महत्त्वाची कामे करून घेतली जात आहेत. अशा प्रकारामुळे उपचारादरम्यान गंभीर वैद्यकीय चुका होण्याची शक्यता वाढत असून रुग्णांच्या आरोग्याशी थेट खेळ सुरू असल्याचा आरोप छावा संघटनेने केला आहे.
यामागे आर्थिक कारणे असल्याचाही दावा करण्यात आला आहे. प्रशिक्षित आणि नोंदणीकृत नर्सला तुलनेने अधिक वेतन द्यावे लागत असल्याने काही रुग्णालये खर्च कमी करण्यासाठी कमी पगारावर अप्रशिक्षित महिलांची नियुक्ती करत असल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी आढळणाऱ्या रुग्णालयांवर कायदेशीर कारवाई करावी, तसेच अशा ठिकाणी कार्यरत असलेल्या अपात्र कर्मचाऱ्यांची तत्काळ हकालपट्टी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, प्रशासनाने १५ दिवसांच्या आत ठोस पावले उचलली नाहीत तर जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांसमोर आंदोलन करण्यात येईल. तसेच बोगस नर्स ठेवणाऱ्या रुग्णालयांची नावे सार्वजनिक करून सोशल मीडियावर प्रसिद्ध केली जातील, असा इशारा अॅड. योगेश पवार यांनी दिला आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रात या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.



