बिल मंजुरीसाठी पैशांची मागणी… एसीबीच्या कारवाईत पहिला हप्ता स्वीकारताना महिला अधिकारी जाळ्यात
बिल मंजुरीसाठी पैशांची मागणी… एसीबीच्या कारवाईत पहिला हप्ता स्वीकारताना महिला अधिकारी जाळ्यात
सोलापूर (प्रतिनिधी):- दि. १८ फेब्रुवारी २०२६
माळशिरस तालुक्यातील मोरोची ग्रामपंचायतीत बिल मंजुरीसाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी ग्रामपंचायत अधिकारी श्रीमती पूजा बाबासाहेब लोंढे यांच्याविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून कारवाई केली. पंचासमक्ष २६,५०० रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना रंगेहात पकडण्यात आले असून गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या माहितीनुसार, तक्रारदार ठेकेदाराने केलेल्या कामाचे बिल काढून देणे तसेच सुरू असलेल्या कामाचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी आरोपी अधिकाऱ्यांनी ५ टक्के प्रमाणे एकूण ४६,५०० रुपये लाचेची मागणी केली होती. त्यातील पहिला हप्ता २६,५०० रुपये देण्यास सांगण्यात आले होते. पडताळणीनंतर दि. १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सापळा रचण्यात आला आणि आरोपीने पंचासमक्ष लाच स्वीकारल्याचे निष्पन्न झाले.
या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सोलापूर युनिटकडून कारवाई करण्यात आली. नातेपुते पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम कलम ७ अन्वये गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
सदर कारवाई शिरीष सरदेशपांडे, अजित पाटील व प्रशांत चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सापळा अधिकारी म्हणून शैलेश चंद्रकांत पवार यांनी काम पाहिले तर तपास अधिकारी म्हणून रविंद्र लांभाते यांची नियुक्ती करण्यात आली.
*एसीबीचे नागरिकांना आवाहन*
शासकीय अधिकारी किंवा त्यांच्या वतीने कोणताही एजंट शासकीय काम करून देण्यासाठी कायदेशीर शुल्काशिवाय लाचेची मागणी करत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले यांनी केले आहे.
संपर्क :
अॅन्टी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन चौक, सोलापूर
टोल फ्री : १०६४ | दूरध्वनी : ०२१७-२३१२६६८
व्हॉट्सअॅप : ९४०४००१०६४
संकेतस्थळ : www.acbmaharashtra.gov.in



