सोलापुरात गुन्हेगारांवर कडक आवळा! 83 तडीपार, हजारो आरोपींवर प्रतिबंधक कारवाई
सोलापुरात गुन्हेगारांवर कडक आवळा! 83 तडीपार, हजारो आरोपींवर प्रतिबंधक कारवाई
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) कार्यालयाकडून सन 2025 मध्ये व्यापक प्रतिबंधक कारवाई करण्यात आली आहे. पोलीस उप-आयुक्त विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली समाजास घातक ठरणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर पावले उचलण्यात आली असून, 83 सराईत आरोपींना तडीपार करण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 अंतर्गत कलम 55, 56 आणि 57 अन्वये ही तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. यामुळे शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसण्यास मदत झाल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
सार्वजनिक शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी शरिराविषयी गुन्हे करणाऱ्या 3,631 आरोपींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 126 अन्वये कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून एक वर्ष मुदतीचे अंतिम बंधपत्र लिहून घेण्यात आले आहे.
तसेच गर्दीच्या ठिकाणी संशयास्पदरीत्या फिरणाऱ्या 257 आरोपींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 128 अंतर्गत कारवाई करत त्यांच्याकडून चांगल्या वर्तणुकीसाठी बंधपत्र घेण्यात आले.
मालमत्तेविषयक गुन्हे करणाऱ्या 413 आरोपींवर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 129 अन्वये कारवाई करण्यात आली आहे. याशिवाय हातभट्टी दारू विक्री करणाऱ्या 241 सराईत आरोपींवर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 93 अंतर्गत प्रतिबंधक कारवाई करून त्यांच्याकडून बंधपत्र घेण्यात आले आहे.
बंधपत्राचे उल्लंघन केल्याने महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 93 अंतर्गत 5 आरोपी, तसेच भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 129 अंतर्गत 1 आरोपी यांना भारतीय नागरिक सुरक्षा संहिता कलम 141 प्रमाणे सोलापूर जिल्हा मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्यात आली आहे. अशा एकूण 6 आरोपींना तुरुंगात पाठवण्यात आले आहे.
पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ) कार्यालयाने स्पष्ट केले आहे की, शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अशी प्रतिबंधक कारवाई पुढेही सातत्याने सुरू राहणार आहे. समाजात शांतता व सुरक्षितता राखण्यासाठी नागरिकांनी पोलिसांना सहकार्य करावे, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.


