सोलापूर

१३ मैदाने ५८ चौक प्रचारासाठी खुले; पण सभा घ्यायची तर किती मोजावे लागणार? मनपाची ‘दरयादी’ जाहीर

१३ मैदाने ५८ चौक प्रचारासाठी खुले; पण सभा घ्यायची तर किती मोजावे लागणार? मनपाची ‘दरयादी’ जाहीर

आयुक्तांची एक खिडकी कक्षास भेट,प्रक्रिया सोपी मात्र खर्चावर चर्चा

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर प्रचार परवानग्या सुलभ, पारदर्शक आणि वेळेत मिळाव्यात, यासाठी मनपेकडून ‘एक खिडकी कक्ष’ प्रभावीपणे कार्यान्वित करण्यात आला आहे. मात्र, याचबरोबर आता प्रचारासाठी लागणाऱ्या मैदान, कॉर्नर सभा, बॅनर, स्टेज आदींचे अधिकृत दरपत्रक जाहीर झाल्याने निवडणूक खर्चाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

* १३ मैदाने, भाडे ₹3,000 ते ₹36,000 प्रतिदिन

मनपाने जाहीर सभांसाठी शहरातील १३ मैदाने, क्रीडांगणे व खुल्या जागा उपलब्ध करून दिल्या असून, त्यांचे भाडे अंदाजे क्षेत्रफळानुसार निश्चित करण्यात आले आहे.

* पुंजाल मैदान, कणिक नगर परिसरातील जागा, कंबर तलावाजवळील जागा – १ एकर क्षेत्रफळासाठी ₹12,000 प्रतिदिन

* भवानी पेठ जयभवानी प्रशालेतील जागा (२ एकर) – ₹24,000 प्रतिदिन

* लिंगराज वल्याळ क्रीडांगण (३ एकर) – ₹36,000 प्रतिदिन

* तर ०.१० ते ०.२५ एकर क्षेत्रफळाच्या छोट्या जागांसाठी ₹3,000 प्रतिदिन भाडे निश्चित करण्यात आले आहे.

* कॉर्नर सभा : प्रत्येक चौकासाठी ₹5,000

लहान प्रचारासाठी शहरातील ५८ चौक व ठिकाणे कॉर्नर सभांसाठी निश्चित करण्यात आली असून, प्रत्येक ठिकाणासाठी ₹5,000 प्रतिदिन भाडे आकारले जाणार आहे. यामध्ये शहरासह जुळे सोलापूर, सैफुल, विडी घरकुल, बाळीवेस, शेळगी, देगाव रोड आदी भागांचा समावेश आहे.

* झेंडे, बॅनर, स्टेजचेही ठरले दर

प्रचार साहित्याच्याही दरांची स्पष्ट नोंद दरपत्रकात आहे.

लहान झेंडा – ₹50

मोठा झेंडा – ₹100

स्टेज / मांडव – प्रति १०० चौ.फुट ₹200

बॅनर / डिजिटल बोर्ड – प्रति चौ.फुट ₹10

साधी कमान – ₹500

बॉक्स कमान – ₹800

खड्डे फी – ₹200 (एकवेळ)

दरम्यान, आयुक्त तथा निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. सचिन ओम्बासे यांनी एक खिडकी कक्षाची प्रत्यक्ष पाहणी करताना निवडणूक आचारसंहिता, पारदर्शकता आणि उमेदवारांना कोणतीही अडचण येऊ नये, याबाबत अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. या वेळी उपायुक्त आशिष लोकरे, सह आयुक्त मनीषा मगर, पी. पी. जाधव यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मनपा, पोलीस विभाग आणि प्रादेशिक परिवहन विभाग यांच्या समन्वयाने सर्व परवानग्या एकाच ठिकाणी दिल्या जात असल्या, तरी प्रचारासाठी लागणाऱ्या वाढत्या खर्चामुळे विशेषतः अपक्ष व लहान उमेदवारांसमोर आर्थिक आव्हान उभे राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

एकीकडे परवानगी प्रक्रिया सुकर झाली असली, तरी “निवडणूक प्रचार सर्वसामान्यांसाठी परवडणारा राहणार का?” असा प्रश्न दरपत्रकामुळे उपस्थित झाला आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!