सोलापूर

खुल्या जागांच्या बेकायदेशीर विक्रीला लगाम! सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; व्यवहार रद्द व गुन्हे दाखल होणार

खुल्या जागांच्या बेकायदेशीर विक्रीला लगाम! सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांचा कडक इशारा; व्यवहार रद्द व गुन्हे दाखल होणार

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर जिल्ह्यातील अकृषिक मंजूर रेखांकनातील खुल्या जागा (ओपन स्पेस) बेकायदेशीररित्या खरेदी-विक्री केल्या जात असल्याच्या तक्रारी गेल्या काही दिवसांपासून जिल्हाधिकारी कार्यालयास प्राप्त होत असून, या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन जिल्हाधिकारी सोलापूर यांनी कडक भूमिका घेतली आहे. अशा बेकायदेशीर व्यवहारांवर तात्काळ आळा घालण्याचे निर्देश देत, नोंदी रद्द करणे व संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

या पार्श्वभूमीवर आज दिनांक 30 डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी सोलापूर यांनी सहाय्यक संचालक, नगर रचना विभाग सोलापूर, अधीक्षक भूमी अभिलेख, सोलापूर शहरातील दुय्यम उपनिबंधक यांच्यासह आढावा बैठक घेतली. या बैठकीस अप्पर जिल्हाधिकारी, निवासी उपजिल्हाधिकारी, तहसीलदार महसूल तसेच तहसीलदार बार्शी हे देखील उपस्थित होते.

बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, मंजूर रेखांकनातील खुली जागा (ओपन स्पेस) कोणालाही खरेदी-विक्री करता येत नाही. मात्र काही विकसकांकडून अशा जागांची बेकायदेशीर विक्री केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असून, हे प्रकार तातडीने थांबवणे आवश्यक आहे.

यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सर्व दुय्यम निबंधकांना निर्देश दिले की, कोणताही खरेदी-विक्री दस्त नोंदणी करताना संबंधित मंजूर रेखांकन तपासून त्यामध्ये ओपन स्पेसचा समावेश नाही याची खात्री केल्याशिवाय नोंदणी करू नये. तसेच यापूर्वी झालेले व्यवहार नोंदवण्यासाठी तलाठी किंवा नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे आले असल्यास, त्यांनीही खुल्या जागेचा दस्त नसल्याची खात्री करूनच नोंदी घ्याव्यात, असे आदेश देण्यात आले.

जर खुल्या जागेची बेकायदेशीर खरेदी-विक्री झाल्याचे दस्त समोर आले, तर संबंधित तहसीलदारांनी त्वरित उपविभागीय अधिकाऱ्यांना अवगत करावे. तसेच सर्व तहसीलदारांनी आपल्या स्तरावर बैठक घेऊन तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना द्याव्यात, असेही निर्देश देण्यात आले.

जिल्हाधिकाऱ्यांनी ठामपणे सांगितले की, ओपन स्पेस संदर्भातील बेकायदेशीर व्यवहार आढळून आल्यास त्याच्या नोंदी रद्द केल्या जातील आणि संबंधित विकसक, खरेदीदार तसेच अन्य दोषींविरुद्ध संबंधित यंत्रणेमार्फत गुन्हे दाखल करण्यात येतील.

या प्रकरणाच्या सखोल चौकशीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय चौकशी समिती स्थापन करण्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली आहे. तसेच नागरिकांनी यासंदर्भात आणखी काही तक्रारी असल्यास तहसीलदार महसूल, जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!