श्री सिद्धेश्वर महायात्रा-२०२६ साठी महापालिकेचा सर्वसमावेशक कृती आराखडा; सुरक्षित व शिस्तबद्ध आयोजनासाठी व्यापक तयारी
श्री सिद्धेश्वर महायात्रा-२०२६ साठी महापालिकेचा सर्वसमावेशक कृती आराखडा; सुरक्षित व शिस्तबद्ध आयोजनासाठी व्यापक तयारी
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर शहराची धार्मिक व सांस्कृतिक ओळख असलेल्या श्री सिद्धेश्वर महायात्रा–२०२६ शांततेत, सुरक्षिततेने व शिस्तबद्ध पद्धतीने पार पाडण्यासाठी सोलापूर महानगरपालिका प्रशासनाने व्यापक स्वरूपात तयारी सुरू केली आहे. आपत्ती व्यवस्थापन कायदा–२००५ अंतर्गत स्वतंत्र कृती आराखडा (Action Plan) तयार करण्यात आला असून, मा. आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार, दि. २६ डिसेंबर २०२५ रोजी उच्चस्तरीय बैठक घेऊन हा आराखडा अंतिम करण्यात आला.

या बैठकीतील सर्व निर्णय, जबाबदाऱ्या व नियोजनाचा सविस्तर इतिवृत्त (Minutes of Meeting) संबंधित सर्व शासकीय यंत्रणा, जिल्हाधिकारी कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन विभाग, पोलीस प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग, महावितरण, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, अन्न व औषध प्रशासन, आरोग्य विभाग तसेच श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटी व यात्रा समिती यांना पाठविण्यात आला आहे. त्यानुसार अंमलबजावणीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.
यात्रेदरम्यान मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होणार असल्याने अक्षता सोहळा व प्रमुख धार्मिक विधींचे थेट प्रक्षेपण (लाईव्ह टेलिकास्ट) करण्यात येणार आहे. देवस्थान ते ज्ञानप्रबोधिनी शाळा मार्ग, पठाण बाग, रिपन हॉल व होम मैदान येथे एकूण आठ एलईडी स्क्रीन बसविण्यात येणार असून, यामुळे गर्दीचे योग्य नियोजन होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
संपूर्ण मंदिर परिसर, होम मैदान, अक्षता सोहळा स्थळ व मिरवणूक मार्गावर १०० टक्के सीसीटीव्ही कव्हरेज देण्यात येणार आहे. स्वतंत्र नियंत्रण कक्ष (कंट्रोल रूम) उभारण्यात येऊन त्याठिकाणी पोलीस, महापालिका कर्मचारी व स्वयंसेवक नियुक्त करण्यात येणार आहेत. आपत्ती व्यवस्थापनासाठी स्वतंत्र कक्ष, २४x७ कार्यरत आपत्कालीन मदत व प्रतिसाद केंद्र, वॉकी-टॉकी, इंटरनेट, दूरध्वनी सुविधा, ध्वनीक्षेपक यांची व्यवस्था करण्यात येणार आहे.

भाविकांच्या सुरक्षिततेसाठी तलाव परिसरात बॅरिकेटिंग, जाळी व सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीसाठी बोटी, शोध व बचाव पथक, रुग्णवाहिका, वैद्यकीय अधिकारी व अग्निशमन दल सज्ज ठेवण्यात येणार आहे. होम मैदानावरील मनोरंजन नगरीतील पाळणे व खेळण्यांसाठी स्ट्रक्चरल व फिटनेस सर्टिफिकेट बंधनकारक करण्यात आले असून, यासाठी स्वतंत्र समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
वाहतूक व्यवस्थापनासाठी ‘नो पार्किंग झोन’ घोषित करण्यात येणार असून, होम मैदान व हरिभाई देवकरण शाळा येथे स्वतंत्र वाहनतळांची व्यवस्था करण्यात येणार आहे. आपत्कालीन मार्ग (Emergency Dedicated Corridor) पूर्णतः मोकळे ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अतिक्रमण हटविणे, अनधिकृत स्टॉल्स व हातगाड्यांवर कारवाई, स्वतंत्र हॉकर्स झोनची व्यवस्था यावर भर देण्यात आला आहे.
धूळ व ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी मॅटिंग, रोलिंग, पाणी मारणे, वाळू टाकणे आदी उपाययोजना करण्यात येणार असून, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दररोज प्रदूषणाची तपासणी केली जाणार आहे. अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत हॉटेल्स व खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या स्टॉल्सची दररोज तपासणी करून भेसळ रोखण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
पोलीस विभागाकडून पुरेसा बंदोबस्त, गर्दी नियंत्रण, व्हिडीओग्राफी, धातू शोधक यंत्रणा, आपत्कालीन योजना व नियमित सराव (मॉक ड्रिल) राबविण्यात येणार आहे. सर्व विभागांनी आपापल्या जबाबदाऱ्यांसाठी SOP (Standard Operating Procedure) तयार करून ठरावीक कालमर्यादेत कामे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
श्री सिद्धेश्वर महायात्रा–२०२६ दरम्यान भाविकांची सुरक्षा, आरोग्य व सुविधा यांना सर्वोच्च प्राधान्य देण्यात येत असून, महापालिका प्रशासन, जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग व देवस्थान समिती यांच्यात सातत्याने समन्वय ठेवण्यात येणार आहे. सुरक्षित, शिस्तबद्ध व यशस्वी यात्रेसाठी सोलापूर महानगरपालिका प्रशासन पूर्णतः कटिबद्ध असल्याचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी स्पष्ट केले आहे.




