नियम सर्वांसाठी की भाजपासाठी वेगळे? उशिरा दाखल बी-फॉर्मवर प्रणिती शिंदेंचा निवडणूक आयोगाला सवाल
नियम सर्वांसाठी की भाजपासाठी वेगळे? उशिरा दाखल बी-फॉर्मवर प्रणिती शिंदेंचा निवडणूक आयोगाला सवाल
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महापालिका निवडणुकीच्या प्रक्रियेत आज एक वादग्रस्त प्रकार समोर आला असून, भारतीय जनता पक्षाने (भाजप) आपल्या उमेदवारांचे बी-फॉर्म निवडणूक आयोगाने निश्चित करून दिलेल्या वेळेच्या नंतर दाखल केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेला इतर सर्व राजकीय पक्षांनी तीव्र विरोध केला असतानाही निवडणूक आयोगाने कोणतीही दखल न घेता ते बी-फॉर्म स्वीकारल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर खासदार प्रणिती ताई शिंदे यांनी थेट निवडणूक आयोगाला प्रश्न उपस्थित करत कारवाईची मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, निवडणूक आयोगाने दिलेल्या वेळेचे पालन सर्व पक्षांना बंधनकारक असते. जर बी-फॉर्म वेळेनंतर दाखल करण्यात आला असेल, तर तो स्वीकारणे म्हणजे निवडणूक नियमांचे उल्लंघन असून लोकशाही प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे.
दरम्यान, बी-फॉर्म उशिरा दाखल झाल्याची बाब लक्षात येताच इतर राजकीय पक्षांनी तात्काळ आक्षेप नोंदवला, मात्र तो आक्षेप डावलून बी-फॉर्म स्वीकारण्यात आल्याने निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जात आहे.
खासदार प्रणिती शिंदे यांनी यासंदर्भात सांगितले की,
“निवडणूक आयोग हा घटनात्मक संस्था असून तो निष्पक्षपणे काम करेल, अशी सर्वांची अपेक्षा आहे. मात्र एका पक्षाला नियम शिथिल करून दिले जात असतील तर ही बाब गंभीर असून त्यावर तातडीने चौकशी व योग्य कारवाई होणे आवश्यक आहे.”
या प्रकारामुळे निवडणूक प्रक्रियेची पारदर्शकता, समान संधीचा सिद्धांत आणि आयोगाची विश्वासार्हता यावर प्रश्न उपस्थित होत असून, आगामी काळात या प्रकरणाचे राजकीय पडसाद अधिक तीव्र होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. निवडणूक आयोग यावर कोणती भूमिका घेते, याकडे आता सर्व राजकीय पक्षांसह नागरिकांचेही लक्ष लागले आहे.



