दोन वाजेपर्यंत नॉर्थकोटमध्ये गर्दीचा उच्चांक, भाजपचे एबी फॉर्म घेऊन आमदार सचिन कल्याणशेट्टी दाखल
दोन वाजेपर्यंत नॉर्थकोटमध्ये गर्दीचा उच्चांक, भाजपचे एबी फॉर्म घेऊन आमदार सचिन कल्याणशेट्टी दाखल
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असल्याने शहरातील नॉर्थकोट कार्यालय परिसरात उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी झुंबड पाहायला मिळाली. दुपारी दोन वाजेपर्यंत अर्ज भरण्यासाठी प्रचंड गर्दी झाली असून वातावरण पूर्णतः तणावपूर्ण बनले आहे.

इच्छुक उमेदवारांना नेमका पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म कोणाला मिळणार याबाबत शेवटच्या क्षणापर्यंत स्पष्टता नसल्याने अनेक उमेदवार व कार्यकर्ते टेन्शनमध्ये दिसून आले. काही प्रभागांमध्ये एकापेक्षा अधिक इच्छुक असल्याने संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे.
याच दरम्यान भारतीय जनता पार्टीचे अधिकृत एबी फॉर्म घेऊन आमदार सचिन कल्याणशेट्टी, रोहिणी तडवळकर तसेच पालकमंत्र्यांचे पीए घुले हे नॉर्थकोट कार्यालयात दाखल झाल्याने राजकीय हालचालींना वेग आला. त्यांच्या आगमनामुळे भाजपच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये सुरू झाली.

नॉर्थकोट परिसरात उमेदवार, समर्थक आणि पक्ष कार्यकर्त्यांची गर्दी वाढल्याने पोलिसांना गर्दी नियंत्रणात ठेवण्यासाठी विशेष प्रयत्न करावे लागले. शेवटच्या क्षणापर्यंत उमेदवारी निश्चित न झाल्याने काही इच्छुक उमेदवार नाराजी व्यक्त करत असल्याचेही चित्र पाहायला मिळाले.
दरम्यान अर्ज भरण्याची अंतिम वेळ जवळ येत असल्याने राजकीय हालचाली अधिक तीव्र झाल्या असून, कोणाला उमेदवारी मिळते याकडे सोलापूरकरांचे लक्ष लागले आहे. मनपा निवडणुकीच्या रणधुमाळीत आजचा दिवस अत्यंत निर्णायक ठरत आहे.



