महाराष्ट्र

“महा ई-सेवा केंद्रांसाठी नवे धोरण लवकरच; मंत्री आशिष शेलार यांचे विभागाला निर्देश”

“महा ई-सेवा केंद्रांसाठी नवे धोरण लवकरच; मंत्री आशिष शेलार यांचे विभागाला निर्देश”

मुंबई (प्रतिनिधी):- राज्यातील नागरिकांना शासनाच्या सर्व डिजिटल सेवा सहज आणि विनाव्यत्यय मिळाव्यात यासाठी महा ई-सेवा केंद्र आणि आधार सेवा केंद्रांची भूमिका अधिक प्रभावी करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासंदर्भात माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.

या बैठकीत राज्यभरातील महा ई-सेवा केंद्र व आधार सेवा केंद्र धारकांच्या विविध मागण्या आणि अडचणींचा आढावा घेण्यात आला. नागरिकांना शासकीय सेवा जलद आणि सोप्या पद्धतीने मिळण्यासाठी या केंद्रांची कार्यपद्धती अधिक सक्षम करण्याची आवश्यकता असल्याचे मंत्री शेलार यांनी यावेळी सांगितले.

मंत्री शेलार म्हणाले की, राज्यातील प्रत्येक नागरिकाला शासनाच्या डिजिटल सेवा विनासायास उपलब्ध व्हाव्यात, ही राज्य सरकारची भूमिका आहे. त्यामुळे महा ई-सेवा व आधार सेवा केंद्रांमार्फत विविध शासकीय सेवा नागरिकांपर्यंत कोणत्याही अडथळ्याविना पोहोचल्या पाहिजेत.

तसेच केंद्र चालकांना येणाऱ्या अडचणी दूर करून त्यांच्या सेवेला अधिक गती देणे आवश्यक आहे. त्यासाठी माहिती तंत्रज्ञान विभागाने पुढील एका महिन्यात सर्वसमावेशक आणि आदर्श कार्यपद्धती तसेच धोरण तयार करावे, असे निर्देश मंत्री शेलार यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

या बैठकीला माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव विरेंद्र सिंह, महाआयटीचे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर, महाआयटीच्या संचालक भुवनेश्वरी एस. यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

या निर्णयामुळे राज्यातील हजारो महा ई-सेवा केंद्र चालकांना दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात असून नागरिकांनाही शासकीय सेवा अधिक जलद आणि सुलभ पद्धतीने मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!