राजकारण

सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणीत सहकार विकास पॅनलचे वर्चस्व; १९ पैकी १८ जागांवर विजयाचा झेंडा!

मोहिते पाटलांनी माळशिरसचा गड राखला; अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी, मनीष देशमुख यांनी अमोल शिंदेंचा २८ मतांनी केला पराभव

सोलापूर जिल्हा बँकेवर भाजपप्रणीत सहकार विकास पॅनलचे वर्चस्व; १९ पैकी १८ जागांवर विजयाचा झेंडा!

मोहिते पाटलांनी माळशिरसचा गड राखला; अर्जुनसिंह मोहिते पाटील विजयी, मनीष देशमुख यांनी अमोल शिंदेंचा २८ मतांनी केला पराभव

सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजपप्रणीत सहकार विकास पॅनलने आपले वर्चस्व सिद्ध करत १९ पैकी तब्बल १८ जागांवर विजय मिळवला. या निकालामुळे जिल्हा बँकेच्या सत्तेच्या राजकारणात सहकार विकास पॅनलचे पारडे जड झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दुसरीकडे, मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. मात्र, माळशिरस मतदारसंघात अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवत मोहिते पाटलांनी आपला प्रभाव कायम ठेवला.

या निवडणुकीत भाजपप्रणीत सहकार विकास पॅनल आणि मोहिते पाटील यांच्या स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलमध्ये थेट लढत पाहायला मिळाली. जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या निवडणुकीकडे विशेष लक्ष लागले होते. निकालात सहकार विकास पॅनलने बहुतांश जागांवर विजय मिळवत आपले वर्चस्व अधोरेखित केले.

• मनीष देशमुख विरुद्ध अमोल शिंदे लढतीची विशेष चर्चा •

या निवडणुकीतील सर्वाधिक चर्चेची लढत बँक व पतसंस्था मतदारसंघात पाहायला मिळाली. या मतदारसंघातून मनीष देशमुख आणि शिवसेना (शिंदे गट) पक्षाचे अमोल शिंदे यांच्यात अटीतटीची लढत झाली. अखेर मनीष देशमुख यांनी अमोल शिंदे यांचा २८ मतांनी पराभव करत विजय संपादन केला. कमी मतांच्या फरकाने लागलेल्या या निकालामुळे या लढतीची जिल्हाभर चर्चा रंगली.

भाजपप्रणीत सहकार विकास पॅनलचे दहा उमेदवार यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते. त्यानंतर निवडणूक झालेल्या जागांपैकी आठ जागांवरही या पॅनलच्या उमेदवारांनी विजय मिळवला. त्यामुळे एकूण १९ पैकी १८ जागा सहकार विकास पॅनलच्या खात्यात जमा झाल्या.

• भाजपप्रणीत सहकार विकास पॅनलचे बिनविरोध विजयी उमेदवार •

१. राजेंद्र राऊत – बार्शी विकास सोसायटी
२. प्रशांत परिचारक – पंढरपूर विकास सोसायटी
३. विक्रांत (बाळराजे) पाटील – मोहोळ विकास सोसायटी
४. सिद्धेश्वर आवताडे – मंगळवेढा विकास सोसायटी
५. यशराज शिंदे – माढा विकास सोसायटी
६. श्रीदीप हसापुरे – दक्षिण सोलापूर विकास सोसायटी
७. पृथ्वीराज माने – उत्तर सोलापूर विकास सोसायटी
८. शंभूराजे जगताप – करमाळा विकास सोसायटी
९. सचिन कल्याणशेट्टी – अक्कलकोट विकास सोसायटी
१०. अजिंक्यराणा पाटील – ओबीसी मतदारसंघ

• भाजपप्रणीत सहकार विकास पॅनलचे विजयी उमेदवार •

१. बाबासाहेब देशमुख – सांगोला विकास सोसायटी
२. अर्चना घाडगे – महिला मतदारसंघ
३. शामल बागल – महिला मतदारसंघ
४. राजेंद्र बंदीछोडे – इतर भटक्या जाती मतदारसंघ
५. रणजितसिंह शिंदे – कृषी व प्रक्रिया मतदारसंघ
६. मनीष देशमुख – बँक व पतसंस्था
७. सूर्यादित्य साळुंखे – दुग्ध विकास मतदारसंघ
८. महादेव कांबळे – अनुसूचित जाती मतदारसंघ

• स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलचा एकमेव विजय •

मोहिते पाटील यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी सहकार पॅनलकडून माळशिरस विकास सोसायटी मतदारसंघातून अर्जुनसिंह मोहिते पाटील यांनी विजय मिळवला. त्यामुळे भाजपप्रणीत पॅनलने १८ जागांवर बाजी मारली असली, तरी माळशिरसमधील विजयाने मोहिते पाटील गटाने आपले अस्तित्व कायम राखले.

एकूणच, सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत १९ पैकी १८ जागांवर विजय मिळवत भाजपप्रणीत सहकार विकास पॅनलने जिल्ह्यातील सहकार क्षेत्रातील राजकीय ताकद दाखवून दिली आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!