सोलापूर

झेडपी अध्यक्षांच्याच बार्शी तालुक्यात शाळांची दुरवस्था उघड; पाच वर्गखोल्या धोकादायक!

जिल्हास्तरीय तपासणी समितीची अचानक पाहणी; स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतील त्रुटींवर तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

झेडपी अध्यक्षांच्याच बार्शी तालुक्यात शाळांची दुरवस्था उघड; पाच वर्गखोल्या धोकादायक!

जिल्हास्तरीय तपासणी समितीची अचानक पाहणी; स्वच्छतागृह, पिण्याचे पाणी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेतील त्रुटींवर तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश

सोलापूर : जिल्हा परिषदेचे अध्यक्ष ज्या बार्शी तालुक्याचे प्रतिनिधित्व करतात, त्याच तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमधील मूलभूत सुविधांची दुरवस्था जिल्हास्तरीय तपासणी समितीच्या अचानक पाहणीत समोर आली आहे. सौंदरे येथील जिल्हा परिषद शाळेतील तब्बल पाच वर्गखोल्या धोकादायक स्थितीत असल्याचे, तर स्वच्छतागृहांची दुरवस्था आणि व्हरांड्यातील प्लास्टर निघाल्याचे निदर्शनास आले. पानगाव येथील शाळांमध्येही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि दिव्यांग विद्यार्थ्यांसाठीच्या स्वच्छतागृहांबाबत गंभीर त्रुटी आढळल्या. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या बाबींची तातडीने दखल घेण्याचे निर्देश समितीने संबंधित प्रशासनाला दिले.

उच्च न्यायालय, मुंबई खंडपीठ (औरंगाबाद) यांच्या जनहित याचिका क्रमांक १/२०१८ अंतर्गत जिल्हास्तरावर गठित करण्यात आलेल्या तपासणी समितीने गुरुवारी बार्शी नगरपालिका आणि तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची अचानक तपासणी केली. शाळांमधील भौतिक सुविधा, विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शासकीय योजनांचा लाभ, शैक्षणिक गुणवत्ता, स्वच्छता, पिण्याचे पाणी आणि विद्यार्थी सुरक्षेच्या अनुषंगाने ही पाहणी करण्यात आली.

समितीने पानगाव येथील मराठी शाळा क्रमांक १ व २, पानगाव मुलींची शाळा, बार्शी नगरपालिका शाळा क्रमांक २ व ३ तसेच सौंदरे येथील शाळेला भेट दिली. या पाहणीमध्ये एकीकडे काही शाळांमधील शैक्षणिक गुणवत्ता आणि नाविन्यपूर्ण उपक्रमांचे सकारात्मक चित्र दिसले, तर दुसरीकडे मूलभूत सुविधांमधील त्रुटींनी शाळांच्या व्यवस्थापनाचा प्रश्न ऐरणीवर आणला.

सौंदरे येथील जिल्हा परिषद शाळेत पाच वर्गखोल्या धोकादायक अवस्थेत असल्याचे समितीच्या निदर्शनास आले. याशिवाय शाळेतील स्वच्छतागृह नादुरुस्त असून व्हरांड्यातील प्लास्टरही निघालेले आहे. विद्यार्थ्यांच्या जीविताला संभाव्य धोका निर्माण होऊ नये, यासाठी या इमारतीच्या दुरुस्तीचा प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याची आवश्यकता समितीने अधोरेखित केली.

पानगाव येथील शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था समाधानकारक नसल्याचे तसेच दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी असलेल्या स्वच्छतागृहांची दुरवस्था झाल्याचेही आढळून आले. या त्रुटी तातडीने दूर करून आवश्यक दुरुस्तीची कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधित प्रशासन आणि मुख्याध्यापकांना देण्यात आल्या.

तपासणीदरम्यान काही शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेचे चित्र समाधानकारक असल्याचे दिसून आले. विशेषतः पानगाव मुलींची शाळा क्रमांक ३ आणि सौंदरे येथील शाळांमधील संगणक व डिजिटल शिक्षण उपक्रम, शिक्षकांचा सहभाग, शिष्यवृत्ती परीक्षा आणि प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी तसेच विविध नाविन्यपूर्ण शैक्षणिक उपक्रमांची समितीने दखल घेतली.

नगरपालिका शाळा क्रमांक ३ मधील मुलींची नियमित उपस्थिती आणि शैक्षणिक सहभागाबाबत माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी यांनी विशेष कौतुक केले.

• पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत स्पष्ट निर्देश •

सर्व शाळांमध्ये प्रधानमंत्री पोषणशक्ती निर्माण योजनेची अंमलबजावणी तपासण्यात आली. विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहारासाठी वापरण्यात येणाऱ्या अन्नधान्याच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड करू नये, असे स्पष्ट निर्देश समितीने दिले. तसेच काही शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समित्यांचे कामकाज आणि तक्रार पेटीच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत सुधारणा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

• विद्यार्थिनींना पोक्सो कायद्याबाबत मार्गदर्शन •

तपासणीदरम्यान प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे यांनी पानगाव येथे आयोजित संविधान दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत शैक्षणिक आणि सामाजिक विषयांवर माहिती दिली. समितीच्या सदस्यांनीही वर्गांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला.

नायब तहसीलदार जयश्री पंचे आणि पोलीस उपनिरीक्षक एस. व्ही. पवार यांनी विद्यार्थिनींशी संवाद साधत पोक्सो कायदा, बालकांचे संरक्षण, विद्यार्थी सुरक्षा आणि सुरक्षित वर्तन याविषयी मार्गदर्शन केले.

विद्यार्थ्यांना शाळांमध्ये सुरक्षित, निर्भय आणि पोषक शैक्षणिक वातावरण मिळणे ही शाळा प्रशासनाची सामूहिक जबाबदारी आहे. सुरक्षेशी संबंधित कोणतीही बाब दुर्लक्षित होता कामा नये, असे समितीने यावेळी स्पष्ट केले.

या जिल्हास्तरीय तपासणी समितीचे अध्यक्ष तथा माजी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश डॉ. शब्बीर औटी होते. समितीमध्ये उपजिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांचे प्रतिनिधी कनिष्ठ अभियंता, पोलीस अधीक्षक ग्रामीण यांचे प्रतिनिधी पोलीस उपनिरीक्षक, प्राथमिक शिक्षणाधिकारी विशाल मुळे, प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे, बार्शी नगरपालिकेचे मुख्याधिकारी तैमूर मुलानी, गटशिक्षणाधिकारी गजानन बाजड, विस्तार अधिकारी बालाजी नाटके आदी अधिकारी उपस्थित होते.

या अचानक तपासणीमुळे बार्शी तालुक्यातील शाळांमधील शैक्षणिक गुणवत्तेसोबतच मूलभूत सुविधांचा प्रश्नही चर्चेत आला आहे. विशेषतः धोकादायक वर्गखोल्या, स्वच्छतागृहे आणि पिण्याच्या पाण्याच्या व्यवस्थेतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रशासन प्रत्यक्षात किती तत्परतेने कार्यवाही करते, याकडे आता पालक आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!