लाचेची रक्कम स्वीकारली अन् वरिष्ठांना फोन केला; पुढे जे घडले ते धक्कादायक!
कला शिक्षकाच्या मोबाईल संभाषणातून वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव उघड; एसीबीने दोघांनाही घेतले ताब्यात

लाचेची रक्कम स्वीकारली अन् वरिष्ठांना फोन केला; पुढे जे घडले ते धक्कादायक!
कला शिक्षकाच्या मोबाईल संभाषणातून वरिष्ठ अधिकाऱ्याचे नाव उघड; एसीबीने दोघांनाही घेतले ताब्यात
परभणी : पत्नीचे थकीत वेतन मिळवून देण्यासाठी शासकीय कार्यालयातच लाचेचा व्यवहार झाल्याचा धक्कादायक प्रकार परभणी जिल्हा परिषदेत उघडकीस आला आहे. तब्बल १२ लाख ४६ हजार रुपयांचे थकीत वेतन मंजूर झाल्यानंतर त्यातील १५ टक्के रक्कम म्हणजेच १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप आहे. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) सापळा रचून एका कला शिक्षकाला लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडले. मात्र, या कारवाईनंतर तपासाला वेगळेच वळण मिळाले. संबंधित शिक्षकाने ही रक्कम वरिष्ठ अधिकाऱ्यांसाठी स्वीकारल्याचे सांगितल्याने जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तथा दिव्यांग सक्षमीकरण विभागाचे अतिरिक्त पदभार असलेले डॉ. संदीप घोन्सीकर यांनाही एसीबीने ताब्यात घेतले. या कारवाईने जिल्हा परिषद प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.
या प्रकरणातील तक्रारदाराच्या पत्नीने ३० ऑक्टोबर २०२४ रोजी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांना एप्रिल २०२१ ते ऑक्टोबर २०२२ या कालावधीतील एकूण १२ लाख ४६ हजार ४९८ रुपये थकीत वेतन मंजूर झाले होते. हे वेतन मिळवून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयातील लिपिक शेख असलम शेख यांनी मंजूर रकमेच्या १५ टक्के म्हणजेच १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितल्याची तक्रार एसीबीकडे करण्यात आली होती.
• मोबाईल संभाषणातून लाच मागितल्याचे निष्पन्न •
तक्रारीच्या अनुषंगाने २० नोव्हेंबर रोजी एसीबीने पडताळणी केली. यावेळी मोबाईलवरील संभाषणातून शेख असलम यांनी १ लाख ८० हजार रुपयांची लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर २६ नोव्हेंबर रोजी परभणी बसस्थानक परिसरातील मिलन ऑप्टिकल्ससमोर एसीबीच्या पथकाने सापळा रचला.
दुपारी १२ वाजून १५ मिनिटांच्या सुमारास तक्रारदाराकडून १ लाख ८० हजार रुपयांची रक्कम स्वीकारताच एसीबीच्या पथकाने शेख असलम यांना रंगेहात पकडले. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी एसीबी कार्यालयात आणण्यात आले.
पंचांसमक्ष करण्यात आलेल्या चौकशीदरम्यान शेख असलम यांनी ही लाचेची रक्कम वरिष्ठ अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर यांच्यासाठी स्वीकारल्याचे सांगितल्याची माहिती समोर आली. यानंतर एसीबीच्या पथकाने पंचांसमक्षच शेख असलम यांच्याकडून घोन्सीकर यांना मोबाईलवर संपर्क साधण्यास सांगितले.
या संभाषणात १ लाख ८० हजार रुपये स्वीकारल्याची माहिती देत ही रक्कम कुठे आणून द्यायची, अशी विचारणा करण्यात आली. त्यावर घरी पैसे घेऊन येण्यास सांगितल्याचे एसीबीच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. या घडामोडींनंतर एसीबीने उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर यांनाही ताब्यात घेतले.
या प्रकरणी कला शिक्षक शेख असलम शेख आणि जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोन्सीकर या दोघांविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ अन्वये परभणी येथील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका कर्मचाऱ्याच्या लाच स्वीकारण्याच्या कारवाईतून वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत तपासाची व्याप्ती पोहोचल्याने जिल्हा परिषद प्रशासनातील कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनासारख्या हक्काच्या रकमेसाठीही लाचेची मागणी होत असल्याचा आरोप समोर आल्याने या प्रकरणाची जिल्हाभर चर्चा सुरू झाली आहे. एसीबीच्या पुढील तपासात आणखी कोणते धागेदोरे समोर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.



