सोलापूर

शासकीय जमिनीच्या गैरवापराचा ठपका; आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त!

शासकीय जमिनीच्या गैरवापराचा ठपका; आदर्श सहकारी गृहनिर्माण संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त!

सोलापूर : सोलापुरातील रंगभवन जवळील आदर्श सहकारी इमारत संघ या गृहनिर्माण संस्थेने रहिवासी प्रयोजनासाठी शासनाकडून मिळालेल्या जागेचा बेकायदेशीरपणे व्यावसायिक वापर करून संस्थेचे नुकसान आणि शर्तभंग केल्याबद्दल सोलापूर शहर उपनिबंधक उमेश पवार यांनी संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त करून प्रशासकाची नियुक्ती केली आहे.
सहकार कायद्याने नोंदणीकृत असलेल्या आदर्श सहकारी इमारत संघ या गृहनिर्माण संस्थेला जिल्हाधिकारी सोलापूर यांनी १९५१ साली नाममात्र दराने फक्त ३७ सभासदांसाठी शासकीय जमीन प्रदान केली आहे.ही जमीन देताना ती केवळ रहिवासी प्रयोजनासाठी वापरण्याची अट घातली आहे.जिल्हाधिकाऱ्यांच्या पूर्व मंजुरी शिवाय जमीन हस्तांतरण करू नये,कोणत्याही व्यवसायासाठी जमीनीचा वापर करू नये,अशा अनेक शर्तीवर ही जमीन दिलेली असताना त्याचा नियमबाह्य विनियोग करून संचालक मंडळाने सहकार कायद्यानुसार वर्तन न करता हुकूमशाही पद्धतीने कारभार केला आणि चुकीचे ठराव करून आर्थिक नुकसान केले.

जिल्हाधिकाऱ्यांच्या मान्यतेशिवाय जमीनीचे हस्तांतरण करून शासनाचे मुद्रांक बुडविले,जमा खर्चाच्या नोंदी ठेवल्या नाहीत,उपविधीतील तरतुदींचा भंग करून मनमानी कारभार केला,संस्थेच्या खुल्या जागेची बिगर सभासदाला नियमबाह्य विक्री केरून आर्थिक गैरव्यवहार केला,संस्थेच्या कामकाजाच्या नोंदी व कागदपत्रे ठेवल्या नाहीत.मनमानीपणे नियमबाह्य ठराव करून संस्थेचे नुकसान केले,सभासदांच्या वारसदारांना सभासद करून घेतले नाही.त्यामुळे न्यायालयीन वाद निर्माण झाले.म्हणून संस्थेच्या बेबंदशाही कारभाराची चौकशी करून संबधितांवर कारवाई करावी अशी तक्रार संस्थेचे वारसदार सभासद महेश बसवेश्वर दुलंगे आणि दिलीप सिध्दे यांनी उपनिबंधकांकडे केली होती.

सहकार कायदा कलम ८९ अन्वये तक्रारीतील गंभीर मुद्यावर सहकार अधिकारी व्ही.टी.चवरे आणि लेखा परीक्षक शेटे यांनी सखोल चौकशी करून अहवाल सादर केला होता.व संचालकांच्या कामकाजावर ठपका ठेवला होता.त्यावर संस्थेचे अध्यक्ष अजित ओक आणि सर्व संचालकांना नोटीस बजावून खुलासा मागविला होता.संस्थेतर्फे ॲड.एम.डी.घोडके यांनी खुलासा दिला होता.

संचालक मंडळाचे कामकाज नियमबाह्य असून संस्थेचा खुलासा समाधानकारक नसून तक्रारींमध्ये तथ्य आढळून आल्यामुळे चौकशी अहवालानुसार सहकारी संस्थेचे सोलापूर शहर उपनिबंधक उमेश पवार यांनी कलम ७८ अ नुसार आदेश काढून संस्थेचे संचालक मंडळ बरखास्त केले आहे.आणि संस्थेचे कामकाज पाहण्यासाठी के.बी.जमादार यांची प्रशासक म्हणून नियुक्ती केली आहे.त्यामुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून आता आर्थिक गैरव्यवहाराबद्दल बरखास्त संचालकांवर काय कारवाई होणार याकडे लक्ष लागले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!