जात वैधतेच्या त्रुटी तातडीने दूर करा; अन्यथा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशात अडचण
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहू न देण्याचे आवाहन; बार्टीच्या महासंचालक दिपा मुधोळ-मुंडे यांचे विद्यार्थ्यांना महत्त्वाचे आवाहन

जात वैधतेच्या त्रुटी तातडीने दूर करा; अन्यथा व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशात अडचण
मागासवर्गीय विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहू न देण्याचे आवाहन; बार्टीच्या महासंचालक दिपा मुधोळ-मुंडे यांचे विद्यार्थ्यांना महत्त्वाचे आवाहन
मुंबई : जात वैधता प्रमाणपत्रातील त्रुटींमुळे मागासवर्गीय विद्यार्थ्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहण्याची वेळ येऊ नये, यासाठी विद्यार्थ्यांनी तातडीने आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या (बार्टी) महासंचालक तथा राज्यातील सर्व जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांच्या मुख्य समन्वयक दिपा मुधोळ-मुंडे यांनी केले आहे.

शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत विविध उच्च व व्यावसायिक शिक्षण अभ्यासक्रमांसाठी केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. यामध्ये राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी जात वैधता प्रमाणपत्राची आवश्यकता असते. त्यामुळे जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे प्रलंबित असलेल्या अर्जांमधील त्रुटींची पूर्तता वेळेत करणे विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे.
शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मध्ये उच्च शिक्षण, तंत्रशिक्षण, कृषी शिक्षण, वैद्यकीय व आयुष शिक्षण तसेच कला शिक्षण विभागातील विविध पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी राखीव प्रवर्गातून प्रवेश देण्यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत केंद्रभूत प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे.
या अभ्यासक्रमांच्या प्रवेशाच्या तारखा राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जाहीर केल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेकडे दुर्लक्ष न करता आपल्या अर्जाची सद्यस्थिती तपासणे आवश्यक आहे.
जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांकडे अनेक विद्यार्थ्यांनी उशिराने अर्ज सादर केल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचबरोबर काही अर्जदारांच्या अर्जांमध्ये आवश्यक कागदपत्रे किंवा इतर बाबींशी संबंधित त्रुटी आढळून आल्या आहेत.
या त्रुटींची पूर्तता करण्याबाबत संबंधित विद्यार्थ्यांना एसएमएस, ई-मेल आणि पत्राद्वारे माहिती देण्यात आली आहे. मात्र, सूचना देऊनही अनेक विद्यार्थी अथवा अर्जदारांनी अद्याप संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी संपर्क साधलेला नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे.
जात वैधता प्रमाणपत्रासाठी सादर केलेल्या अर्जामध्ये काही त्रुटी असल्यास त्या विहित पद्धतीने दूर करून आवश्यक कागदपत्रे सादर करण्याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित अर्जदाराचीच आहे.
त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना समितीकडून त्रुटींची पूर्तता करण्याबाबत संदेश, ई-मेल अथवा पत्र प्राप्त झाले आहे, त्यांनी विलंब न करता संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी संपर्क साधावा आणि आवश्यक ती पूर्तता करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सुट्टीच्या दिवशीही समित्यांचे कार्यालय सुरू ठेवण्याचे निर्देश
विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये आणि त्यांना व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून केवळ जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेमुळे वंचित राहावे लागू नये, यासाठी आवश्यकतेनुसार जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समित्यांनी सुट्टीच्या दिवशीही कार्यालय सुरू ठेवावे, असे निर्देश देण्यात आले आहेत.
प्रवेश प्रक्रिया आणि त्यासंबंधीच्या अंतिम मुदती लक्षात घेता विद्यार्थ्यांनी शेवटच्या क्षणापर्यंत प्रतीक्षा न करता आपली कागदपत्रे आणि अर्जाची स्थिती तपासून आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करणे गरजेचे आहे.
विद्यार्थ्यांनी काय करावे?
• जात वैधता प्रमाणपत्रासाठी केलेल्या अर्जाची सद्यस्थिती तपासावी.
• समितीकडून त्रुटी पूर्ततेबाबत एसएमएस, ई-मेल किंवा पत्र आले असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
• संबंधित जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीशी त्वरित संपर्क साधावा.
• मागविण्यात आलेली कागदपत्रे आणि त्रुटींची पूर्तता वेळेत करावी.
• व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशाची अंतिम तारीख लक्षात घेऊन प्रक्रिया पूर्ण करावी.
“जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रक्रियेत झालेल्या विलंबामुळे कोणताही पात्र मागासवर्गीय विद्यार्थी व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशापासून वंचित राहू नये,” या उद्देशाने विद्यार्थ्यांनी आवश्यक ती कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे दिपा मुधोळ-मुंडे यांनी स्पष्ट केले आहे.



