अविनाश गोडसे यांच्या बदलीविरोधात मराठा सेवा संघ आक्रमक; ‘बोंबाबोंब’ आंदोलनाचा इशारा
अवघ्या वर्षभरात बदली केल्याचा आरोप; बदली रद्द करण्यासाठी जि.प. अध्यक्ष दीपक वैद्य यांना निवेदन
अविनाश गोडसे यांच्या बदलीविरोधात मराठा सेवा संघ आक्रमक; ‘बोंबाबोंब’ आंदोलनाचा इशारा
अवघ्या वर्षभरात बदली केल्याचा आरोप; बदली रद्द करण्यासाठी जि.प. अध्यक्ष दीपक वैद्य यांना निवेदन
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागातील प्रशासन अधिकारी तथा लिपिक कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष अविनाश दत्तात्रय गोडसे यांच्या बदलीविरोधात मराठा सेवा संघासह विविध संघटना आक्रमक झाल्या आहेत. अवघ्या एका वर्षाच्या आत गोडसे यांची बदली करण्यात आल्याचा दावा करत ही बदली तातडीने रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास जिल्हा परिषद प्रशासनाविरोधात ‘बोंबाबोंब’ आंदोलन करण्याचा इशारा मराठा सेवा संघाने दिला आहे.

या संदर्भात मराठा सेवा संघाच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य यांना निवेदन देत बदलीच्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी केली. तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या आदेशानंतर गोडसे यांची बदली करण्यात आल्याने त्यांच्या नियमित कार्यकाळापूर्वीच बदली का करण्यात आली, असा सवाल कर्मचारी संघटनांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
गोडसे यांची बदली शासनाच्या बदलीविषयक नियमांचा विचार न करता करण्यात आल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे. ते बदलीस पात्र नसतानाही त्यांची बदली करण्यात आल्याचा दावा मराठा सेवा संघाने केला असून, या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे.
गोडसे हे जिल्हा परिषद कर्मचारी वर्गामध्ये सर्वांशी समन्वयाने काम करणारे तसेच कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करणारे अभ्यासू अधिकारी व संघटनात्मक नेतृत्व म्हणून परिचित असल्याचे कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे अचानक झालेल्या बदलीमुळे कर्मचारी वर्गात नाराजी निर्माण झाल्याचा दावा संघटनांकडून करण्यात येत आहे.
मराठा सेवा संघाच्या निवेदनानुसार, अविनाश गोडसे हे मराठा सेवा संघ, जिल्हा परिषद शाखेचे अध्यक्ष आहेत. त्यांच्या बदलीमागे नेमके प्रशासकीय कारण काय आहे, याबाबत प्रशासनाने स्पष्टता द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.
बदलीचा आदेश तातडीने रद्द करून गोडसे यांना न्याय द्यावा, अन्यथा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर बोंबाबोंब आंदोलन करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही विविध कर्मचारी व सामाजिक संघटनांकडून देण्यात आला आहे.
गोडसे यांच्या बदलीबाबत जिल्हा परिषदेतील काही लोकप्रतिनिधी व सदस्यांनीही नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या बदलीचा मुद्दा आता प्रशासकीय पातळीपुरता मर्यादित न राहता संघटनात्मक आणि राजकीय चर्चेचा विषय बनला आहे.
दरम्यान, निवेदनात करण्यात आलेल्या आरोपांबाबत जिल्हा परिषद प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. त्यामुळे गोडसे यांची बदली कोणत्या प्रशासकीय कारणामुळे करण्यात आली, त्यांचा नियमित कार्यकाळ किती होता आणि बदलीच्या प्रक्रियेत शासनाच्या नियमांचे पालन झाले का, याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका मांडणे अपेक्षित आहे.
निवेदन देतेवेळी मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष जी. के. देशमुख, मराठा सेवा संघाचे शहर अध्यक्ष सूर्यकांत पाटील, संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष प्रकाश ननवरे, संभाजी ब्रिगेडचे शहर उपाध्यक्ष सचिन चव्हाण, लिंबराज जाधव, राजू व्यवहारे, दत्ता जाधव, प्रकाश डोंगरे, राजेंद्र भोसले, संतोष माने, जीवन यादव, मल्लिकार्जुन, शेखर भोसले, दास यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आता या निवेदनाची जिल्हा परिषद प्रशासन कितपत गांभीर्याने दखल घेते, गोडसे यांच्या बदलीचा फेरविचार केला जातो का आणि प्रस्तावित ‘बोंबाबोंब’ आंदोलनाची वेळ येते का, याकडे जिल्हा परिषद कर्मचारी व विविध संघटनांचे लक्ष लागले आहे.



