महाराष्ट्र

१५ जूनला सोलापुरात भव्य प्रवेशोत्सव; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके आणि गणवेश – कादर शेख ,शिक्षणाधिकारी प्राथमिक

२२ लाख पाठ्यपुस्तकांपैकी ८१ टक्के पुस्तके जिल्ह्यात दाखल; पहिल्याच दिवशी मोफत वितरण

१५ जूनला सोलापुरात भव्य प्रवेशोत्सव; पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती पुस्तके आणि गणवेश – कादर शेख ,शिक्षणाधिकारी प्राथमिक

२२ लाख पाठ्यपुस्तकांपैकी ८१ टक्के पुस्तके जिल्ह्यात दाखल; पहिल्याच दिवशी मोफत वितरण

सोलापूर : राज्यातील सर्व शाळांमध्ये १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होत असून विद्यार्थ्यांचे स्वागत उत्साहपूर्ण वातावरणात करण्यासाठी शिक्षण विभागाने व्यापक तयारी केली आहे. शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्याचे निर्देश दिले असून, त्याच अनुषंगाने सोलापूर जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी जिल्ह्यातील सर्व शाळांना विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे.

प्राथमिक शिक्षणाधिकारी कादर शेख यांनी सांगितले की, शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके आणि गणवेश उपलब्ध करून देण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन पूर्ण केले आहे. विद्यार्थ्यांचा पहिला दिवस आनंददायी आणि संस्मरणीय व्हावा यासाठी प्रत्येक शाळेत प्रवेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येणार आहे.

कादर शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर जिल्ह्यात पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी सुमारे २२ लाख पाठ्यपुस्तके वितरित करावयाची आहेत. त्यापैकी १८ लाख पाठ्यपुस्तके जिल्ह्यात प्राप्त झाली असून ८१ टक्के पुरवठा पूर्ण झाला आहे.

यावर्षी दुसरी, तिसरी, चौथी आणि सहावीच्या बदललेल्या अभ्यासक्रमाची पुस्तकेही प्राप्त झाली आहेत. उर्वरित कन्नड, उर्दू आणि सेमी-इंग्रजी माध्यमांची पुस्तके पुढील दोन दिवसांत उपलब्ध होणार असून सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी पुस्तके वितरित केली जाणार आहेत.

तसेच जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महानगरपालिका शाळांमधील १ लाख ८० हजार ५२७ विद्यार्थ्यांना शाळेच्या पहिल्याच दिवशी गणवेश देण्यात येणार आहेत. यासाठी शासनाकडून चार कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून तो तालुकास्तरावर वितरित करण्यात आला आहे.

गणवेशाच्या गुणवत्तेबाबत बोलताना कादर शेख म्हणाले की, विद्यार्थ्यांना दिले जाणारे गणवेश टिकाऊ, आरामदायी आणि दर्जेदार असतील. पॉलिस्टरचे प्रमाण मर्यादित ठेवण्यात येणार असून विद्यार्थ्यांच्या त्वचेला कोणतीही हानी होणार नाही, याची काळजी घेतली जाणार आहे.

शाळांमध्ये नवीन विद्यार्थ्यांचे फुलांनी स्वागत, सांस्कृतिक कार्यक्रम, पालकांचा सहभाग, पुस्तक व गणवेश वितरण यासह विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांमध्ये शाळेबद्दल आत्मीयता आणि आकर्षण निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे.

कादर शेख यांनी सांगितले की, जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या ‘गुढीपाडवा पट वाढवा’ मोहिमेमुळे गेल्या तीन वर्षांत विद्यार्थ्यांच्या प्रवेशामध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. यंदाही जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!