“मनपाचे पार्किंग नियोजन जाहीर; अव्यवस्थित वाहनांवर कारवाई, QR कोड प्रणाली लागू”
मनपा परिसरातील वाहन गोंधळाला आळा घालण्यासाठी स्वतंत्र पार्किंग, CCTV देखरेख व नागरिकांसाठी विशेष व्यवस्था लागू
“मनपाचे पार्किंग नियोजन जाहीर; अव्यवस्थित वाहनांवर कारवाई, QR कोड प्रणाली लागू”
मनपा परिसरातील वाहन गोंधळाला आळा घालण्यासाठी स्वतंत्र पार्किंग, CCTV देखरेख व नागरिकांसाठी विशेष व्यवस्था लागू
सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिकेच्या परिसरात वाढत्या वाहनांच्या गोंधळाला आळा घालण्यासाठी प्रशासनाने मोठा निर्णय घेतला असून, विविध घटकांसाठी स्वतंत्र पार्किंग व्यवस्था लागू करण्यात आली आहे. यासोबतच अव्यवस्थित व बेवारस वाहनांवर कठोर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
महानगरपालिकेत विविध कामांसाठी शहरासह आजूबाजूच्या जिल्ह्यांतून मोठ्या प्रमाणात नागरिक येत असल्याने परिसरात वाहनांची गर्दी वाढली आहे. त्यामुळे परिसराचे विद्रूपीकरण होण्याबरोबरच वाहतुकीलाही अडथळा निर्माण होत असल्याचे चित्र दिसत होते. या पार्श्वभूमीवर आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे (भा.प्र.से.) यांच्या मार्गदर्शनाखाली नवीन पार्किंग नियोजन जाहीर करण्यात आले आहे.
• रंगकोडनुसार पार्किंग व्यवस्था •
मनपा प्रशासनाने विविध अधिकारी, पदाधिकारी, कर्मचारी, पत्रकार व नागरिकांसाठी वेगवेगळ्या रंगकोडनुसार पार्किंग निश्चित केले आहे.
• तपकिरी (Brown):
शासनाकडून प्रतिनियुक्तीने आलेले वरिष्ठ अधिकारी (अतिरिक्त आयुक्त ते सहाय्यक आयुक्त, नगर अभियंता, मुख्य लेखाधिकारी इ.) – प्रशासकीय इमारतीच्या उजव्या बाजूला
• नारंगी (Orange):
पदाधिकारी, नगरसेवक व पत्रकार – कौन्सिल हॉल शेजारी
• आकाशी निळा (Sky Blue):
मनपा अधिकारी – मनपाच्या मागील बाजूस (ICCC परिसर)
• जांभळा (Purple):
नगर अभियंता, पीएचई व इतर विभाग कर्मचारी – नगर अभियंता स्टोअर परिसर
• हिरवा (Green):
लेखा व लेखापरीक्षण विभाग – ICCC पार्किंग
नागरिकांसाठी: हुतात्मा स्मृती मंदिर व ICCC परिसरात स्वतंत्र पार्किंग
* नवीन पार्किंग व्यवस्थेत तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात येणार आहे.
प्रत्येक वाहनासाठी रंगकोडनुसार QR कोड असलेले वाहन पास देण्यात येणार आहेत.
* वाहनांची यादी तयार करून संगणक विभागाकडून नोंद
* पार्किंग ठिकाणी CCTV कॅमेरे बसविणार
* पार्किंग लाईनसाठी पांढरे पट्टे (मार्किंग)
यामुळे पार्किंग व्यवस्थेत पारदर्शकता व शिस्त राखली जाणार आहे.
सुरक्षा विभागाकडून पुरेसे सुरक्षा रक्षक तैनात करून वाहन योग्य ठिकाणी लावण्याबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सर्व विभाग प्रमुखांना त्यांच्या अधिनस्त कर्मचारी व अधिकाऱ्यांना या नियमांचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दरम्यान, मनपाने मुख्य रस्त्यांवर व परिसरात उभी असलेली बेवारस व वाहतुकीस अडथळा ठरणारी वाहने २ मेनंतर जप्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
अतिक्रमण विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की, अशा वाहनांची माहिती, फोटो व ठिकाण 9404158070 या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाठवावी.
सोलापूर महानगरपालिकेने पार्किंग व्यवस्थेत शिस्त आणण्यासाठी रंगकोड, QR कोड व तंत्रज्ञानाचा वापर करत व्यापक नियोजन केले आहे. अव्यवस्थित पार्किंग व बेवारस वाहनांवर कारवाई करत शहरातील वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रशासनाचा प्रयत्न असल्याचे या निर्णयातून स्पष्ट होते.



