गरीब रुग्णाच्या आईवर शस्त्रक्रिया… पण डिस्चार्जसाठी पैशांची मागणी; डॉक्टर-आरोग्य मित्र एसीबीच्या जाळ्यात!

गरीब रुग्णाच्या आईवर शस्त्रक्रिया… पण डिस्चार्जसाठी पैशांची मागणी; डॉक्टर-आरोग्य मित्र एसीबीच्या जाळ्यात!
सोलापूर (प्रतिनिधी):- महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत उपचार मिळणे बंधनकारक असताना, मंगळवेढा येथील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये रुग्णाकडून पैशांची मागणी केल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत डॉक्टर व आरोग्य मित्राविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदार यांच्या ७२ वर्षीय आईचा पाय घसरून पडल्याने त्यांना मंगळवेढा येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तपासणीनंतर शस्त्रक्रिया आवश्यक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने तक्रारदाराने महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेतून मोफत उपचार करण्याची विनंती केली.
मात्र, या योजनेअंतर्गत उपचार मोफत असतानाही संबंधित डॉक्टरांनी शस्त्रक्रियेसाठी तब्बल १६ हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे. त्यापैकी ६ हजार रुपये आधीच घेऊन शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर रुग्णाला डिस्चार्ज देण्यासाठी उर्वरित १० हजार रुपयांची मागणी करण्यात आली.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे धाव घेतली. तक्रारीची पडताळणी दोन पंचांच्या उपस्थितीत करण्यात आली असता, डॉक्टर व आरोग्य मित्र यांनी १० हजार रुपयांची मागणी करून तडजोडीअंती ५ हजार रुपये घेण्यास तयार झाल्याचे स्पष्ट झाले.
यानंतर या प्रकरणी मंगळवेढा पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २९४/२०२६ अंतर्गत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम ७ व १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये खाजगी डॉक्टर डॉ. अरुणकुमार महिंद्रकर (वय अंदाजे ४५) व आरोग्य मित्र सोमनाथ इंगळे (वय अंदाजे ३८) यांचा समावेश आहे.
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सोलापूर युनिटने वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केली. या घटनेमुळे शासकीय योजनांच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, गरीब रुग्णांच्या हक्कांवर गदा येत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, कोणत्याही शासकीय कामासाठी कायदेशीर शुल्काव्यतिरिक्त लाचेची मागणी होत असल्यास नागरिकांनी तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा,असे आवाहन अधिकाऱ्यांनी केले आहे.




