सोलापुरात भीषण अपघात; उपजीविकेसाठी निघालेले दोन जिवलग कायमचे हरपले
‘अजून किती बळी?’ नागरिकांचा संताप

सोलापुरात भीषण अपघात; उपजीविकेसाठी निघालेले दोन जिवलग कायमचे हरपले
‘अजून किती बळी?’ नागरिकांचा संताप
सोलापूर (प्रतिनिधी):- शहरातील बोरामणी नाका परिसरात शुक्रवारी सकाळी घडलेल्या भीषण अपघाताने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली. एका भरधाव ट्रकने दुचाकीला दिलेल्या जोरदार धडकेत दोन जिवलग मित्रांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना सकाळी सुमारे आठ वाजण्याच्या सुमारास घडली.
मृतांची ओळख सैफन शेखफरीद पटेल (वय ४०) आणि हुजूर अलाउद्दीन पटेल (वय ३६) अशी झाली असून, दोघेही दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी गावचे रहिवासी होते. रोजीरोटी मिळवण्यासाठी भटारी काम करणारे हे दोघे मित्र एका कामाच्या निमित्ताने सोलापुरात येत असताना नियतीने त्यांच्यावर घाला घातला.
प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ट्रकचा वेग अत्यंत जास्त होता. दुचाकीला जोरदार धडक बसल्याने दोघेही रस्त्यावर फेकले गेले आणि गंभीर जखमी झाले. अपघात इतका भीषण होता की, घटनास्थळीच दोघांनी प्राण सोडले.
अपघातानंतर स्थानिकांनी तत्काळ मदतकार्य सुरू करत दोघांना श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय येथे हलवले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.
या घटनेमुळे दोन्ही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सैफन पटेल यांच्या पश्चात मोठा परिवार असून, त्यांच्या निधनामुळे कुटुंबाचा आधार हरपला आहे.
तसेच हुजूर पटेल यांच्या कुटुंबावरही या घटनेने मोठा आघात झाला आहे.
दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच नातेवाईक, मित्रपरिवार आणि ग्रामस्थांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली. परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून, अनेकांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला.
नागरिकांनी शहरातील जड वाहतुकीचा मुद्दा पुन्हा उपस्थित करत प्रशासनावर टीका केली आहे. काही ट्रक चालक बेदरकारपणे वाहन चालवत असल्याने अशा दुर्घटना वारंवार घडत असल्याचे सांगण्यात येत आहे. “अजून किती जणांचा बळी जाणार?” असा सवाल उपस्थित करत कठोर नियम व अंमलबजावणीची मागणी नागरिकांनी केली आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही चालक मोठ्या आवाजात गाणी ऐकत वाहन चालवतात, त्यामुळे आजूबाजूचे इशारे दुर्लक्षित होतात आणि अपघाताचा धोका वाढतो. त्यामुळे जड वाहनांवर नियंत्रण, वेगमर्यादा काटेकोरपणे अंमलात आणणे आणि शहरातील वाहतुकीचे नियोजन सुधारण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
या प्रकरणी पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, ट्रक चालकाविरुद्ध कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.



