क्राईम

छत्तीसगडहून सोलापुरात गांजाची तस्करी उधळली; एलसीबीच्या सापळ्यात तिघे जेरबंद

36 किलो 270 ग्रॅम गांजासह 7 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त; मोहोळ, सांगोला आणि पंढरपूर येथील आरोपींना अटक

छत्तीसगडहून सोलापुरात गांजाची तस्करी उधळली; एलसीबीच्या सापळ्यात तिघे जेरबंद

36 किलो 270 ग्रॅम गांजासह 7 लाख 55 हजारांचा मुद्देमाल जप्त; मोहोळ, सांगोला आणि पंढरपूर येथील आरोपींना अटक

सोलापूर : परराज्यातून अंमली पदार्थ गांजाची तस्करी करून सोलापूर जिल्ह्यात विक्रीसाठी आणणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत 36 किलो 270 ग्रॅम गांजा, दोन मोबाईल फोन असा एकूण 7 लाख 55 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तिघा आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील अंमली पदार्थांची वाहतूक आणि विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याचे आदेश स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना दिले होते. त्यानुसार निरीक्षक जगताप यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ आणि त्यांच्या पथकाला अंमली पदार्थांविरोधात कठोर कारवाईच्या सूचना दिल्या होत्या.

दरम्यान, पोलीस हवालदार मोहन मनसावाले यांना गोपनीय माहिती मिळाली की, सचिन बनसोडे आणि एकनाथ लेंढवे हे दोघे छत्तीसगड राज्यातील जगदलपूर येथून गांजा घेऊन सोलापूर तालुक्यातील बोरामणी परिसरात विक्रीसाठी येणार आहेत. या माहितीच्या आधारे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली एनडीपीएस कायद्यानुसार सापळा रचण्यात आला.

हैदराबाद-सोलापूर महामार्गावरील बोरामणी शिवारातील हॉटेल वैष्णवीजवळ संशयास्पद हालचाली करणारे दोन इसम दोन मोठ्या बॅगांसह उभे असल्याचे पोलिसांना दिसले. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपली नावे सचिन लक्ष्मण बनसोडे (वय 39, रा. टाकळी सिकंदर, ता. मोहोळ) आणि एकनाथ नामदेव लेंढवे (वय 33, रा. मेथवडे, ता. सांगोला) अशी सांगितली.

त्यांच्या ताब्यातील बॅगांची झडती घेतली असता दोन प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये 36 किलो 270 ग्रॅम वजनाचा गांजा आढळून आला. जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत 7 लाख 25 हजार 400 रुपये असून दोन मोबाईल फोनसह एकूण 7 लाख 55 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला.

चौकशीत आरोपींनी हा गांजा छत्तीसगडमधील जगदलपूर येथून खरेदी केल्याची कबुली दिली. तसेच हा माल पंढरपूर तालुक्यातील खर्डी येथील अनिल लक्ष्मण रोंगे याला विक्री करण्यासाठी आणल्याचे सांगितले. त्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत अनिल रोंगे यालाही मोहोळ परिसरातून ताब्यात घेऊन अटक केली.

या प्रकरणी पोलीस हवालदार मोहन मनसावाले यांच्या फिर्यादीवरून सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 318/2026 दाखल करण्यात आला आहे. आरोपींविरुद्ध गुंगीकारक औषध द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम 1985 अंतर्गत कलम 8 (क), 20 (ब) (ii) (क) आणि 29 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अटक करण्यात आलेल्या तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून त्यांना 9 जून 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ करीत आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या नेतृत्वात पार पडली. कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानदेव वाघ, सहाय्यक पोलीस निरीक्षक भीमगोंडा पाटील, श्रेणी पोलीस उपनिरीक्षक ख्वाजा मुजावर, नारायण गोलेकर, धनाजी गाडे, मोहन मनसावाले, हरिदास पांढरे, अनिश शेख, अश्विनी गोटे, अक्षय डोंगरे तसेच चालक सतीश बुरकुल यांनी सहभाग घेतला.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!