करकंब परिसरात अवैध शालेय बस वाहतुकीवर मोठी कारवाई; वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर १.२२ लाखांचा दंड

पंढरपूर (प्रतिनिधी) :- पंढरपूर तालुक्यातील करकंब पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात शालेय विद्यार्थी वाहतुकीतील गंभीर त्रुटींना आळा घालण्यासाठी वाहतूक विभाग आणि पोलिसांनी संयुक्त कारवाई केली. ग्रामीण भागातील अनेक ठिकाणांहून विद्यार्थ्यांची वाहतूक होत असताना शालेय विद्यार्थी वाहतूक नियमावली २०११ अंतर्गत आवश्यक पूर्तता न करणाऱ्या वाहनांवर कठोर कारवाई करण्यात आली.
प्रादेशिक परिवहन अधिकारी मा. नेरपगार सर यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबवण्यात आली. या कारवाईदरम्यान अनुज्ञप्ती (Licence), परवाना, योग्यता प्रमाणपत्र, विमा प्रमाणपत्र, प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र आदी मूलभूत आणि कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता नसलेल्या तसेच अवैधरीत्या शालेय विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करण्यात आली.

तपासणी दरम्यान अनेक वाहने दोषी आढळून आली. नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित वाहनांवर सुमारे १,२२,००० रूपये इतका दंड आकारण्यात आला आहे. ही कारवाई मोटार वाहन निरीक्षक श्री. विशाल यादव, सहायक मोटार वाहन निरीक्षक श्री. बाळासाहेब सलगर आणि श्रीमती तेजस्विनी वायचळ यांच्या संयुक्त पथकाने केली.
दोषी आढळून आलेली सर्व वाहने करकंब पोलीस स्टेशनमध्ये अटकाव करून ठेवण्यात आली असून पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि शालेय बस व्यवस्थेत शिस्त राखण्यासाठी अशा कारवाया पुढेही सुरू राहणार असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.



