जागतिक महिला दिनानिमित्त एस.व्ही.सी.एस. हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम; ५०० महिलांचा फेटा बांधून सन्मान
जागतिक महिला दिनानिमित्त एस.व्ही.सी.एस. हायस्कूलमध्ये विविध कार्यक्रम; ५०० महिलांचा फेटा बांधून सन्मान
सोलापूर :- आधुनिक काळात स्त्रियावरील अन्यायाचे प्रमाण कमी होत असून समाजाचा स्त्रियांकडे पाहण्याचा दृष्टिकोन हळूहळू बदलत आहे. त्यामुळे स्त्रियांनी समाजात व कुटुंबात वावरताना जिथे अन्याय होईल, त्या ठिकाणी अन्याय सहन न करता न्याय मिळेपर्यंत संघर्ष करत राहिले पाहिजे. स्त्री कणखर व कठोर बनल्याशिवाय भारतीय समाजात खरी सामाजिक समता प्रस्थापित होणार नाही, असे प्रतिपादन एस. व्ही. सी. एस. हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य संगप्पा म्हमाणे यांनी केले.
जागतिक महिला दिनानिमित्त प्रशालेत आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन प्राचार्य संगप्पा म्हमाणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी संस्थेचे संचालक शशिकांत रामपुरे, उपमुख्याध्यापक धनंजय नकाते तसेच पर्यवेक्षक केदार पटणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. वेदांत हुमनाबादे, यशश्री चौरे आणि साक्षी अळगुंडगी यांनी आपल्या भाषणातून इतिहासातील विविध प्रेरणादायी महिलांची माहिती देत महिलांच्या शिक्षणाचे व स्वावलंबनाचे महत्त्व स्पष्ट केले. तसेच इयत्ता आठवी व नववीतील विद्यार्थिनींनी ‘स्त्री शक्तीचा जागर’ या गीतावर सुंदर नृत्य सादर करून स्त्रीच्या विविध रूपातील शक्तीचे प्रभावी दर्शन घडविले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भक्ती अळगुंडगी व अनन्या आगबतीन यांनी केले, तर समर्थ कोरे यांनी आभार प्रदर्शन केले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक-प्राध्यापिका, शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

*५०० महिलांचा सन्मान*
जागतिक महिला दिनानिमित्त महिला पालक दीपा स्वामी, अर्चना लंगोटे तसेच प्रशाला व ज्युनिअर कॉलेजमधील सर्व प्राध्यापिका, शिक्षिका आणि विद्यार्थिनींना सुमारे ५०० जणांना फेटा बांधून व भेटवस्तू देऊन प्राचार्य संगप्पा म्हमाणे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रशालेच्या या उपक्रमाचे महिला पालकांनी मनापासून कौतुक केले.




