महाराष्ट्र

३१ डिसेंबरपूर्वी हॉटेल्सवर ‘विशेष नजर’… सरकारचा मोठा आदेश नेमका काय?

३१ डिसेंबरपूर्वी हॉटेल्सवर ‘विशेष नजर’… सरकारचा मोठा आदेश नेमका काय?

मुंबई (प्रतिनिधी):- नववर्षाच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर तसेच ३१ डिसेंबरच्या उत्सवकाळात नागरिकांच्या आरोग्याची कोणतीही तडजोड होऊ नये, यासाठी राज्य सरकारने कडक पावले उचलली आहेत. हॉटेल्स, उपहारगृहे व इतर खाद्य आस्थापनांमध्ये तयार होणारे अन्न स्वच्छ, सुरक्षित व निर्भेळ असणे अनिवार्य असून, यासाठी अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील सर्व रेस्टॉरंट्स, हॉटेल्स व खाद्य आस्थापनांची सखोल तपासणी करावी, असे स्पष्ट निर्देश अन्न व औषध प्रशासन व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिले आहेत.

उत्सवाच्या काळात अन्नातून विषबाधा, भेसळ अथवा अस्वच्छतेमुळे नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी अन्नसुरक्षा कायद्यानुसार तपासणी मोहीम अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. अन्न तयार करण्याची पद्धत, स्वच्छता, कच्च्या मालाची गुणवत्ता, साठवणूक तसेच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी या सर्व बाबींची काटेकोर तपासणी करण्यात येणार असल्याचेही मंत्री झिरवाळ यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, केवळ कारवाईच नव्हे तर उत्कृष्ट स्वच्छता व अन्नसुरक्षा मानकांचे पालन करणाऱ्या हॉटेल आस्थापनांना प्रोत्साहन देण्याचा निर्णयही शासनाने घेतला आहे. जिल्हा व राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या हॉटेल्सना पुरस्कार देण्यात येणार आहेत.

याअंतर्गत २६ जानेवारी २०२६ रोजी जिल्हास्तरावरील पुरस्कार संबंधित जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. तर राज्यस्तरावर उत्कृष्ट ठरलेल्या हॉटेल्सचा मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते सन्मान करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी दिली.

या निर्णयामुळे अन्नसुरक्षेच्या नियमांचे काटेकोर पालन करणाऱ्या हॉटेल्सना प्रोत्साहन मिळणार असून, नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार अन्न उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. नववर्ष साजरे करताना आरोग्याशी कोणतीही तडजोड होऊ नये, हाच शासनाचा मुख्य उद्देश असल्याचेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!