सोलापूर

महापालिका निवडणुकीसाठी NOC एक खिडकी कक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी २३० अर्ज दाखल

महापालिका निवडणुकीसाठी NOC एक खिडकी कक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद; पहिल्याच दिवशी २३० अर्ज दाखल

सोलापूर (प्रतिनिधी) :- सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन अर्ज दाखल करताना उमेदवारांना आवश्यक असलेल्या विविध ना-हरकत प्रमाणपत्रांसाठी (NOC) सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या एक खिडकी कक्षाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. नॉर्थकोट प्रशाला येथे सुरू झालेल्या या कक्षामध्ये पहिल्याच दिवशी तब्बल २३० अर्ज दाखल झाल्याची माहिती महापालिकेने दिली.

निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या नावावर असलेल्या मालमत्तेसाठी मालमत्ता कराची ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. उमेदवाराच्या नावावर गाळा (दुकान) असल्यास त्यासाठी स्वतंत्र एनओसी घेणे आवश्यक असून, खुली जागा असल्यास संबंधित मिळकतीबाबतही महापालिकेच्या संबंधित विभागाकडून ना-हरकत प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे.

तसेच उमेदवार कोणताही व्यवसाय करत असल्यास, त्या व्यवसायाचा परवाना (लायसन्स) वैध असल्याचे कागदपत्र अर्जासोबत जोडणे आवश्यक आहे. याशिवाय उमेदवार महानगरपालिकेचा मक्तेदार (ठेकेदार) आहे किंवा नाही, याबाबतचा सविस्तर तपशील लेखी स्वरूपात सादर करणेही बंधनकारक आहे.

वरील सर्व माहितीबाबत उमेदवारांनी स्वयंघोषणापत्र (Self Declaration) अनिवार्यपणे सादर करावे लागणार असून, त्यामधील माहिती सत्य व अचूक असल्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहणार आहे, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

दि. २१ डिसेंबर २०२५ पासून नॉर्थकोट प्रशाला येथे कार्यालयीन वेळेत हा एक खिडकी कक्ष सुरू असून, अर्ज सादर करण्यासाठी उमेदवारांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक उमेदवारांनी वेळेआधीच सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून आपले अर्ज एक खिडकी कक्षामध्ये सादर करावेत, असे आवाहन सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.

तसेच मिळकत करासंदर्भातील ना-हरकत प्रमाणपत्र ऑनलाईन पद्धतीने काढून ते अर्जासोबत जोडावे, असेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!