सोलापूर

जयंती उत्सव काळात डॉल्बी व प्रखर प्लाझमा-बीम लाईट वापरावर बंदी : सोलापूर पोलीस आयुक्तांचे आदेश

जयंती उत्सव काळात डॉल्बी व प्रखर प्लाझमा-बीम लाईट वापरावर बंदी : सोलापूर पोलीस आयुक्तांचे आदेश

सोलापूर, (जिमाका) :- माता रमाई जयंती (दि. ०७ फेब्रुवारी) व छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव (दि. १५ ते १९ फेब्रुवारी) निमित्त सोलापूर शहरात विविध मिरवणुकींचे आयोजन करण्यात आले आहे. या उत्सव कालावधीत (दि. ०७ ते २० फेब्रुवारी २०२६) मिरवणुकांमध्ये डॉल्बी सिस्टीमचा मोठ्या प्रमाणात वापर होण्याची शक्यता लक्षात घेता, नागरिकांच्या आरोग्यास व सुरक्षिततेस धोका निर्माण होऊ नये म्हणून डॉल्बी सिस्टीमचा वापर प्रतिबंधित करण्यात आला आहे.

गतकाळात डॉल्बी सिस्टीममुळे काही नागरिकांना कान, छातीचे त्रास होऊन अपंगत्व अथवा जीवितास धोका निर्माण झाल्याची प्रकरणे निदर्शनास आली होती. याबाबत जेष्ठ नागरिक व सामाजिक संघटनांनी निवेदने सादर करून डॉल्बी सिस्टीममुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबत चिंता व्यक्त केली होती. त्यानुसार भारतीय नागरीक सुरक्षा संहिता,२०२३ चे कलम १६३(१) प्रमाणे हा आदेश पोलीस आयुक्त, शहर एम. राजकुमार यांनी दिला आहे.

तसेच मिरवणुकीदरम्यान प्लाझमा बीम लाईट, लेझर लाईट यांचा प्रखर प्रकाश वाहन चालकांच्या डोळ्यांना दिपवून अपघात घडू शकतो, तसेच नागरिकांच्या डोळ्यांना कायमस्वरूपी इजा होण्याची शक्यता असल्याने या प्रकाशयंत्रणांवरही बंदी घालण्यात आली आहे.

सोलापूर शहरात या उत्सव काळात सुमारे २१९ सार्वजनिक मंडळे स्थापन होत असून त्यापैकी ३२ मंडळे मिरवणुकीत सहभागी होतात. मंडळांनी साऊंड सिस्टीमसोबत प्लाझमा व लेझर लाईटचा वापर टाळावा, असे आदेश देण्यात आले आहेत.

या आदेशाचा भंग करणाऱ्या व्यक्तीवर भारतीय न्याय संहिता, २०२३ चे कलम २२३ नुसार कारवाई करण्यात येईल, असेही पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!