विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांची ग्रामीण जीवनाशी भेट; उत्तर सोलापूर शिक्षण विभागाचा अभिनव उपक्रम

विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांची ग्रामीण जीवनाशी भेट; उत्तर सोलापूर शिक्षण विभागाचा अभिनव उपक्रम
सोलापूर :- समावेशित शिक्षण उपक्रमांतर्गत उत्तर सोलापूर तालुक्यातील विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक दिवसीय क्षेत्रीय भेट व शैक्षणिक सहल नुकतीच पाकणी येथील सीनाई ॲग्रो टुरिझम येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. विद्यार्थ्यांना निसर्गाच्या सान्निध्यात आनंददायी अनुभव मिळावा तसेच ग्रामीण जीवनाची प्रत्यक्ष ओळख व्हावी या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
हा उपक्रम उत्तर सोलापूरचे गटशिक्षणाधिकारी अविचल महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला. या क्षेत्रीय भेटीस तालुका विस्ताराधिकारी बापूराव जमादार यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच समावेशित शिक्षण अंतर्गत कार्यरत सर्व IED (आयडी) शिक्षक यावेळी उपस्थित होते.
या सहलीदरम्यान विद्यार्थ्यांनी सीनाई ॲग्रो टुरिझम येथे विविध उपक्रमांचा मनमुराद आनंद घेतला. विद्यार्थ्यांनी बोटिंगचा आनंद लुटला, उंटावर बसण्याचा अनुभव घेतला तसेच बैलगाडीची सवारी करत ग्रामीण जीवनाचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. याशिवाय बागेमध्ये विविध खेळ खेळत तसेच पाण्यातील रेन डान्समध्ये सहभाग घेत विद्यार्थ्यांनी आनंदोत्सव साजरा केला.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा यासाठी गाणी म्हणणे, गाण्यांवर नृत्य सादर करणे तसेच विविध मनोरंजनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सर्व विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत आपले कलागुण सादर केले.
यावेळी विस्ताराधिकारी बापूराव जमादार यांनी पालक व विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की, कोणताही विद्यार्थी दिव्यांग नसतो; प्रत्येक विद्यार्थी इतरांप्रमाणेच सक्षम असतो. योग्य संधी व प्रोत्साहन मिळाल्यास तो नक्कीच प्रगती करू शकतो. विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळावी म्हणून उत्तर सोलापूर तालुक्याच्या वतीने “सितारे जमीन पर” हा प्रेरणादायी चित्रपटही दाखवण्यात आला होता. त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या आनंदासाठी आणि अनुभवासाठी या क्षेत्रीय भेटीचे नियोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
सदर क्षेत्रीय भेट यशस्वी करण्यासाठी लक्ष्मण राऊत, आकाश शेंद्रे, स्विटी पावटे, गोहरबानो पठाण, महताब शेख, संजय पाटील, बापूराव पाटील, औदुंबर बंडगर, कैलास भडोळे, वासंती माळवदकर, श्रीशैल तीर्थकर, बरगली सोनकडे, लक्ष्मण काशीद आदी आयडी शिक्षकांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांना निसर्ग, ग्रामीण जीवन आणि विविध अनुभवांमधून आनंदासोबत आत्मविश्वासही मिळाल्याचे शिक्षकांनी सांगितले.



