सोलापूर

विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांचा सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा!

शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकासासह पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाची तपासणी; योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाला सूचना

विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांचा सोलापूर जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा आढावा!

शिक्षण, आरोग्य, महिला व बालविकासासह पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाची तपासणी; योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशासनाला सूचना

सोलापूर : ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार शासकीय सेवा उपलब्ध करून देण्यासह विविध शासकीय योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्याच्या सूचना पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी सोलापूर जिल्हा परिषद प्रशासनाला दिल्या. सोलापूर जिल्हा परिषदेला भेट देऊन त्यांनी विविध विभागांच्या कामकाजाचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी विभागनिहाय अहवालांचे सादरीकरण करण्यात आले.

सोलापूर जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ग्रामीण भागातील विकासकामे, शासकीय योजनांची अंमलबजावणी आणि नागरिकांना दिल्या जाणाऱ्या सेवांचा आढावा घेण्यात आला. सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून नियोजनबद्ध पद्धतीने काम करावे. योजनांची अंमलबजावणी करताना नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून त्यांना गुणवत्तापूर्ण सेवा उपलब्ध करून द्याव्यात, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी दिले.

बैठकीत प्राथमिक शिक्षण विभागांतर्गत जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधांच्या श्रेणीकरणासाठी निश्चित करण्यात आलेल्या निकषांचा आढावा घेण्यात आला. शाळांमधील उपलब्ध सुविधा आणि त्यांचे मूल्यमापन यासंदर्भातील माहिती सादर करण्यात आली.

यासोबतच महिला व बालविकास विभाग, आरोग्य विभाग आणि ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजाचाही आढावा घेण्यात आला. ग्रामीण भागातील नागरिकांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देताना संबंधित विभागांनी कामकाजाचा नियमित आढावा घ्यावा आणि योजनांच्या अंमलबजावणीत अधिक प्रभावीपणे कार्य करावे, असे मार्गदर्शन विभागीय आयुक्तांनी केले.

आकांक्षीत तालुका कार्यक्रमांतर्गत सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट आणि सांगोला तालुक्यांच्या कामकाजाचाही या बैठकीत आढावा घेण्यात आला. या तालुक्यांमध्ये राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची आणि संबंधित विभागांच्या कामकाजाची माहिती सादर करण्यात आली.

जिल्ह्यातील ग्रामीण भागाचा विकास साधण्यासाठी उपलब्ध शासकीय योजनांचा प्रभावी वापर करणे आवश्यक आहे. त्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करून योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवावा, असे विभागीय आयुक्तांनी सूचित केले.

जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा विचार करता पशुधनाच्या आरोग्याची योग्य काळजी घेणे आवश्यक असल्याचे विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांनी नमूद केले. दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर पशुधनाच्या आरोग्याशी संबंधित बाबींना प्राधान्य देण्यासह शासनाच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर त्यांनी भर दिला.

विभागांनी आपल्या कामकाजाचा नियमित आढावा घेऊन नियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत. ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय कार्यालयांमार्फत वेळेत आणि दर्जेदार सेवा मिळतील, यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे, असेही त्यांनी सांगितले.

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी सेवा संकल्प अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती विभागीय आयुक्तांना दिली. या अभियानाच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत शासकीय सेवा प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांची माहिती त्यांनी सादर केली.

यावेळी विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांच्या हस्ते सेवा संकल्प अभियानांतर्गत लाभार्थ्यांना आयुष्मान भारत कार्डचे वितरण करण्यात आले.

जिल्हा परिषदेच्या विविध विभागांनी नागरिकांना केंद्रस्थानी ठेवून कामकाज करावे, योजनांच्या प्रगतीचा नियमित आढावा घ्यावा आणि प्रशासनाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, असे मार्गदर्शन विभागीय आयुक्तांनी बैठकीच्या समारोपावेळी केले.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर आयुक्त नितीन माने, अप्पर आयुक्त प्रांजल शिंदे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, सहाय्यक आयुक्त राजनंदिनी भागवत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) सूर्यकांत भुजबळ, विभागीय आयुक्त कार्यालयाचे विजय धनवरे यांच्यासह जिल्हा परिषदेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!