सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये आज ‘जागतिक हात धुवा दिन’!
सीईओ कुशल जैन यांचे निर्देश; ‘हात धुवा नायक व्हा’ संदेशातून स्वच्छतेबाबत जनजागृती

सोलापूर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये आज ‘जागतिक हात धुवा दिन’!
सीईओ कुशल जैन यांचे निर्देश; ‘हात धुवा नायक व्हा’ संदेशातून स्वच्छतेबाबत जनजागृती
सोलापूर : स्वच्छतेच्या सवयींना प्रोत्साहन देऊन संसर्गजन्य आजारांपासून बालकांचे आणि नागरिकांचे संरक्षण करण्यासाठी सोलापूर जिल्ह्यात गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी जागतिक हात धुवा दिन साजरा करण्यात येणार आहे. संकल्प सेवा अभियान आणि स्वच्छता ही सेवा-२०२६ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळा, अंगणवाड्या आणि ग्रामपंचायतींमध्ये साबणाने हात धुण्याच्या योग्य पद्धतीबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या आहेत.

हातांच्या स्वच्छतेचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेऊन विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य नागरिकांमध्ये हात धुण्याची सवय रुजविण्यावर या उपक्रमात भर दिला जाणार आहे. शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांच्या माध्यमातून हात धुण्याची योग्य पद्धत शिकविण्यात येणार असून, स्वच्छतेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
दरवर्षी १५ ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिन म्हणून साजरा केला जातो. सन २००८ पासून या दिवसाच्या माध्यमातून साबणाने हात धुण्याचे महत्त्व जगभरात अधोरेखित केले जात आहे. यंदाची संकल्पना ‘Be a Handwashing Hero’ अर्थात ‘हात धुवा नायक व्हा’ अशी आहे.

हात स्वच्छ धुणे ही केवळ वैयक्तिक स्वच्छतेची बाब नसून सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीनेही महत्त्वाची सवय आहे. योग्य पद्धतीने साबणाने हात धुतल्यामुळे अनेक संसर्गजन्य आजारांचा धोका कमी होण्यास मदत होते. विशेषतः लहान मुलांमध्ये स्वच्छतेच्या सवयी विकसित झाल्यास अतिसार, पोटाचे विकार आणि श्वसनाशी संबंधित संसर्गांचा प्रसार रोखण्यास हातभार लागतो.
जागतिक हात धुवा दिनानिमित्त विद्यार्थ्यांना आणि अंगणवाडीतील बालकांना हात धुण्याची शास्त्रीय व योग्य पद्धत समजावून सांगण्यात येणार आहे. यामध्ये खालील बाबींवर भर दिला जाणार आहे.
• स्वच्छ वाहत्या पाण्याने प्रथम हात ओले करावेत.
• हातांवर पुरेसा साबण किंवा हँडवॉश लावावा.
• दोन्ही हातांचे तळवे एकमेकांवर चोळावेत.
• हातांच्या मागील बाजूस आणि बोटांच्या मधील जागेत साबण लावून स्वच्छ करावे.
• नखांखालील भाग आणि मनगट व्यवस्थित स्वच्छ करावे.
• हात किमान २० सेकंद चोळून धुवावेत.
• त्यानंतर स्वच्छ पाण्याने हात धुऊन स्वच्छ टॉवेलने किंवा योग्य पद्धतीने हात कोरडे करावेत.
जेवणापूर्वी, शौचालयाचा वापर केल्यानंतर आणि हात अस्वच्छ झाल्यावर साबणाने हात धुण्याची सवय प्रत्येकाने अंगीकारावी, असा संदेश या उपक्रमातून दिला जाणार आहे.
जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये जागतिक हात धुवा दिन प्रभावीपणे साजरा करण्यासाठी ग्रामसेवकांनी आवश्यक नियोजन करावे, अशा सूचना जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी सूर्यकांत भुजबळ यांनी दिल्या आहेत.
तसेच, संबंधित कार्यालये, शाळा आणि अंगणवाड्यांमध्ये प्रत्यक्ष कृती व प्रात्यक्षिकांसह जनजागृती मोहीम राबविण्यात यावी. या उपक्रमाचे छायाचित्रे आणि व्हिडिओंसह अहवाल सादर करण्याच्या सूचना उपमुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव यांनी दिल्या आहेत.
हात धुण्याची साधी सवय अनेक आजारांपासून संरक्षण मिळवून देण्यास मदत करते. त्यामुळे केवळ जागतिक हात धुवा दिनापुरते मर्यादित न राहता वर्षभर हातांच्या स्वच्छतेचे पालन करणे आवश्यक आहे. शाळा, अंगणवाड्या आणि ग्रामपंचायतींच्या माध्यमातून ही सवय विद्यार्थ्यांपासून कुटुंबापर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
‘हात धुवा नायक व्हा’ या संदेशातून स्वच्छतेची संस्कृती रुजवून सुदृढ आणि निरोगी समाजनिर्मितीस हातभार लावण्याचे आवाहन जिल्हा परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.



