महाराष्ट्र

प्रजासत्ताक दिनी एक लाख शाळांमध्ये एकच आदेश…… आणि थेट वर्ल्ड रेकॉर्ड!

प्रजासत्ताक दिनी एक लाख शाळांमध्ये एकच आदेश…… आणि थेट वर्ल्ड रेकॉर्ड!

मुंबई (प्रतिनिधी):- देशाच्या ७७ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्य शासनाच्या वतीने ‘राष्ट्र प्रथम’ या अभिनव उपक्रमांतर्गत राज्यभर एकाच वेळी अभूतपूर्व सामूहिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शासकीय ध्वजवंदनानंतर शालेय विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांवर शिस्तबद्ध आणि समन्वयपूर्ण कवायत संचलन सादर करत राष्ट्रप्रेमाचा जागर केला.

या ऐतिहासिक उपक्रमात राज्यातील सर्व विभागांतील सुमारे एक लाख शाळांमधील दोन कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच वेळी सहभाग नोंदवला. विद्यार्थ्यांच्या या कवायतीसाठी सात लाख शिक्षकांनी मार्गदर्शन व सहभाग दिला. एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणावर देशभक्तीपर कवायत सादर होणे ही बाब देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर लक्षवेधी ठरली.

‘राष्ट्र प्रथम’ या उपक्रमाचा उद्देश विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, शिस्त, एकात्मता आणि नागरिक कर्तव्यांची जाणीव निर्माण करणे हा होता. राज्यातील शहरी तसेच ग्रामीण भागातील शाळांमध्ये हा उपक्रम उत्साहात पार पडला. ध्वजवंदनानंतर विद्यार्थ्यांनी एकसुरात कवायत सादर करत संपूर्ण राज्यात राष्ट्रभक्तीचे वातावरण निर्माण केले.

या उपक्रमाची अधिकृत नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स, लंडन (World Book of Records, London) या आंतरराष्ट्रीय संस्थेने घेतली असून, या माध्यमातून नवीन विश्वविक्रम प्रस्थापित झाल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिली. त्यांनी या उपक्रमासाठी विद्यार्थी, शिक्षक, शाळा प्रशासन तसेच संबंधित विभागांचे अभिनंदन केले.

या उपक्रमामुळे प्रजासत्ताक दिनाचा उत्सव केवळ सोहळ्यापुरता मर्यादित न राहता, तो राष्ट्रसेवा आणि कर्तव्यभावनेचा प्रेरणादायी संदेश देणारा ठरला असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!