“माध्यम क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वाढता वापर अनिवार्य” — ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस

मुंबई (प्रतिनिधी) :- माध्यमांशी संवाद साधताना काळानुरूप बदलत्या तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर करण्याची गरज आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), डिजिटल अॅप्स, ‘टेक्स्ट-टू-व्हिडिओ’ प्लॅटफॉर्म आणि चॅट जीपीटीसारख्या साधनांचा उपयोग करून प्रसिद्धी साहित्य तयार केल्यास कामाची गुणवत्ता आणि वेग दोन्ही वाढू शकतात, असे मत ज्येष्ठ पत्रकार सम्राट फडणीस यांनी व्यक्त केले.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने आयोजित विशेष चर्चासत्रात ते मार्गदर्शन करत होते.
यावेळी संचालक (माहिती- वृत्त व जनसंपर्क) गोविंद अहंकारी, सामान्य प्रशासन विभागाचे अवर सचिव अजय भोसले, उपसंचालक (वृत्त) वर्षा आंधळे, तसेच अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सम्राट फडणीस पुढे म्हणाले की,“आज अनेक इलेक्ट्रॉनिक माध्यमांमध्ये डिजिटल अँकरचा वापर वाढत आहे. त्यामुळे मानवी संसाधनावरील ताण कमी होतो, अचूकता वाढते आणि वेळेची मोठी बचत होते.”
त्यांनी सोशल मीडियावर वाढत चाललेल्या दिशाभूलकारक माहिती (Fake News) बाबतही चिंता व्यक्त केली. येत्या दहा वर्षांत फॅक्ट-चेकिंगची गरज आणखी वाढेल आणि यासाठी डिजिटल ट्रॅकिंग व आधुनिक विश्लेषण पद्धतींचा सक्षम वापर अनिवार्य ठरेल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चर्चासत्रादरम्यान उपस्थित अधिकाऱ्यांनी विविध विषयांवर श्री. फडणीस यांच्याशी संवाद साधला. कार्यक्रमाच्या प्रारंभी संचालक गोविंद अहंकारी यांनी पुष्पगुच्छ देऊन श्री. फडणीस यांचे स्वागत केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विभागीय संपर्क अधिकारी संध्या गरवारे यांनी केले तर आभारप्रदर्शन वरिष्ठ सहायक संचालक काशीबाई थोरात यांनी मानले.
डिजिटल माध्यमांच्या वाढत्या प्रभावामुळे पारंपरिक पत्रकारितेचे स्वरूप बदलत असून, आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करणं ही काळाची गरज असल्याचा संदेश या चर्चासत्रातून स्पष्ट झाला.



