राजकारण

सोलापुरात भाजपला मोठा झटका : प्रभाग २४ ब मधील नगरसेविका वनिता पाटील यांचा जातीचा दाखला रद्द

सोलापुरात भाजपला मोठा झटका : प्रभाग २४ ब मधील नगरसेविका वनिता पाटील यांचा जातीचा दाखला रद्द

सोलापूर (प्रतिनिधी):- सोलापूर महानगरपालिकेतील राजकारण सध्या महापौर–उपमहापौर निवडीच्या पार्श्वभूमीवर तापले असतानाच भारतीय जनता पार्टीला मोठा राजकीय आणि कायदेशीर धक्का बसला आहे. प्रभाग क्रमांक २४ ब (अनुसूचित जमाती – महिला राखीव) येथील भाजपच्या नगरसेविका वनिता संतोष पाटील यांचा अनुसूचित जमातीचा जातीचा दाखला जात पडताळणी समितीने अवैध ठरवला आहे.

Oplus_16908288

या प्रभागातून झालेल्या निवडणुकीत वनिता पाटील यांनी कोळी महादेव (अनुसूचित जमाती) या प्रवर्गाचा दाखला सादर करून विजय मिळवला होता.
त्यांनी निवडणुकीदरम्यान वनिता रामचंद्र तलवार या नावाने जातीचे प्रमाणपत्र सादर केल्याचे समोर आले आहे. मात्र, या प्रमाणपत्रावर संशय व्यक्त करत त्यांच्या विरोधी उमेदवार आणि माजी उपमहापौर राजेश काळे यांच्या पत्नी उषा काळे यांनी जात पडताळणी समितीकडे तक्रार दाखल केली होती.

तक्रारीवर सविस्तर सुनावणी झाल्यानंतर अनुसूचित जमाती प्रमाणपत्र तपासणी समिती, कोकण विभाग (ठाणे) यांनी वनिता पाटील यांचा जातदाखला अवैध ठरवत तो रद्द व जप्त करण्याचा निर्णय दिला. हा निर्णय अंतिम आणि बंधनकारक असल्याने, संबंधित नगरसेविकेच्या पदावर राहण्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

या पार्श्वभूमीवर उषा काळे यांनी सोलापूर महानगरपालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन सादर केले आहे. निवेदनात त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की, वनिता पाटील यांना तात्काळ नगरसेवक पदावरून अपात्र घोषित करावे,पोटनिवडणूक होईपर्यंत त्यांचे सर्व अधिकार गोठवावेत,कोणताही विकास निधी अथवा शासकीय लाभ देऊ नये आणि प्रभाग २४ ब मध्ये तातडीने पोटनिवडणूक जाहीर करून पात्र अनुसूचित जमाती महिला उमेदवारास संधी द्यावी.

उषा काळे यांनी आपल्या निवेदनात असा इशाराही दिला आहे की, जर प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही तर हा प्रकार आदिवासी समाजाच्या घटनादत्त आरक्षण हक्कांवर घाला ठरेल.

या संपूर्ण प्रकरणामुळे सोलापूर महानगरपालिकेच्या राजकारणात खळबळ उडाली असून, भाजपसह महापालिका प्रशासनाची पुढील भूमिका काय असेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!