विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला आढावा; मार्डी-बानेगाव शाळांना भेट
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची पाहणी; आरोग्य तपासणी, डिजिटल डिटॉक्स आणि उच्च जोखमीच्या गर्भवती मातेस विशेष काळजी घेण्याच्या सूचना
विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी घेतला आढावा; मार्डी-बानेगाव शाळांना भेट
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची पाहणी; आरोग्य तपासणी, डिजिटल डिटॉक्स आणि उच्च जोखमीच्या गर्भवती मातेस विशेष काळजी घेण्याच्या सूचना
सोलापूर : जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या सूचनेनुसार आणि आरोग्य विभागाचे उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा आढावा घेण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांनी मार्डी आणि बानेगाव येथील जिल्हा परिषद शाळांना भेट देत प्रत्यक्ष पाहणी केली.

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत ६ ते १८ वर्षे वयोगटातील विद्यार्थ्यांची वैद्यकीय पथकांमार्फत नियमित आरोग्य तपासणी केली जाते. या तपासण्या नियोजित वेळेत होत आहेत का, विद्यार्थ्यांना आवश्यक आरोग्य सेवा मिळत आहेत का, तसेच तपासणीदरम्यान आढळणाऱ्या आजारांवर योग्य उपचार व संदर्भ सेवा दिली जात आहे का, याची माहिती डॉ. कोपुरवाड यांनी घेतली.
विद्यार्थ्यांच्या तपासणीत कोणतीही आरोग्य समस्या आढळल्यास त्यावर तातडीने उपचार करण्यासोबतच आवश्यकतेनुसार पुढील उपचारासाठी संदर्भ सेवा उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी आरोग्य पथकांना दिल्या.
यावेळी कुष्ठरोग विभागाचे सहसंचालक डॉ. मोहन शेगर यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. जिल्हा परिषद शाळेतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी परिस्थिती कितीही प्रतिकूल असली तरी जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या जोरावर मोठी स्वप्ने पूर्ण करावीत, असे आवाहन त्यांनी केले.
विद्यार्थ्यांना वैयक्तिक स्वच्छता, परिसराची स्वच्छता, संतुलित आहार, योगासने आणि नियमित मैदानी खेळ यांचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. त्याचबरोबर मोबाईल आणि टीव्हीच्या अतिवापरामुळे होणाऱ्या शारीरिक व मानसिक दुष्परिणामांची माहिती देत विद्यार्थ्यांना ‘डिजिटल डिटॉक्स’ बाबत मार्गदर्शन करण्यात आले.
पाहणी दौऱ्यादरम्यान मार्डी येथील एका अति जोखमीच्या (High-Risk) गर्भवती मातेच्या घरी आरोग्य पथकाने भेट दिली. तिच्या आरोग्याची विचारपूस करून आवश्यक माहिती घेण्यात आली. संबंधित महिलेवर विशेष लक्ष ठेवून नियमित आरोग्य तपासणी करण्याच्या सूचना आरोग्य कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.
या दौऱ्यावेळी जिल्हा समन्वयक प्रदीप नामदे, शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद तसेच आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.



