‘निरोगी गाव’साठी सर्व विभागांचा समन्वय गरजेचा; डीएचओ डॉ. सतीश कोपुरवाड यांचे प्रतिपादन
‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत कार्यशाळा; प्रतिबंधात्मक आरोग्य, स्वच्छता, सुरक्षित पाणी आणि जनसहभागावर भर

‘निरोगी गाव’साठी सर्व विभागांचा समन्वय गरजेचा; डीएचओ डॉ. सतीश कोपुरवाड यांचे प्रतिपादन
‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत कार्यशाळा; प्रतिबंधात्मक आरोग्य, स्वच्छता, सुरक्षित पाणी आणि जनसहभागावर भर
सोलापूर : ‘प्रजा निरोगी, तर राज्य सशक्त’ या संकल्पनेला केंद्रस्थानी ठेवून सोलापूर जिल्ह्यात गावपातळीवर आरोग्यविषयक उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानांतर्गत जिल्हा परिषदेत विशेष कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. निरोगी गावाची निर्मिती ही केवळ आरोग्य विभागाची जबाबदारी नसून ग्रामपंचायत, शिक्षण, महिला व बाल विकास, पाणीपुरवठा व स्वच्छता यांसह सर्व संबंधित विभागांच्या समन्वित प्रयत्नांतूनच ती शक्य आहे, असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांनी स्पष्ट केले.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कुशल जैन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उपमुख्य कार्यकारी अधिकारी (प्रशासन व ग्रामपंचायत) श्री. सूर्यकांत भुजबळ आणि उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बाल विकास) श्री. प्रसाद मिरकले यांच्या प्रमुख उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली. कार्यशाळेचे आयोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.
मार्गदर्शन करताना डॉ. सतीश कोपुरवाड यांनी सांगितले की, ‘आरोग्य संपन्न गाव’ निर्मितीचा केंद्रबिंदू हा गावातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य असला पाहिजे. आजार झाल्यानंतर उपचार करण्याबरोबरच आजार होऊ नयेत यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना, आरोग्य संवर्धन, नियमित तपासणी आणि व्यापक जनजागृती यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे.

गावातील आरोग्यविषयक गरजा ओळखून स्थानिक पातळीवर कृती आराखडा तयार करणे, उपलब्ध आरोग्य सुविधांचा प्रभावी वापर करणे तसेच शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ पात्र नागरिकांपर्यंत पोहोचविणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, पोषण, शिक्षण आणि आरोग्य हे परस्परांशी संबंधित घटक असून, या सर्वांचा समन्वय साधल्याशिवाय गावाचा सर्वांगीण आरोग्यविषयक विकास साध्य होणार नाही, असेही डॉ. कोपुरवाड यांनी स्पष्ट केले.
कार्यशाळेत ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाचे पुणे विभागीय समन्वयक अमित शर्मा आणि गणेश ननवरे यांनी अभियानाची अंमलबजावणी, गावपातळीवरील नियोजन आणि विविध उपक्रमांबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांनी शासन परिपत्रकातील तरतुदी, अभियानाची कार्यपद्धती तसेच अभियानांतर्गत गावांना देण्यात येणाऱ्या पुरस्कारासाठी विचारात घेतले जाणारे विविध आरोग्यविषयक निर्देशांक याबाबत माहिती दिली.
कार्यशाळेत प्रत्येक गावासाठी नागरिकांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवून सर्वसमावेशक आरोग्य कृती आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. संसर्गजन्य तसेच जीवनशैलीशी संबंधित आजारांचे प्रतिबंध, नियमित आरोग्य तपासणी, आरोग्य नोंदींचे अद्ययावतीकरण आणि उपलब्ध आरोग्य सुविधांचा सातत्याने आढावा घेण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.
महिला, बालके आणि ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजांकडे विशेष लक्ष देण्याचे आवाहन करण्यात आले. यासोबतच नागरिकांना सुरक्षित पिण्याचे पाणी, स्वच्छता, पोषण आणि आरोग्यविषयक योग्य माहिती उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला.
शासनाच्या विविध आरोग्य योजनांचा लाभ पात्र नागरिकांना वेळेत आणि प्रभावीपणे मिळत आहे की नाही, याचे नियमित मूल्यमापन करण्याची गरज व्यक्त करण्यात आली. आरोग्य सेवांची उपलब्धता, त्यांचा नागरिकांकडून होणारा वापर आणि गावातील आरोग्यविषयक स्थिती यांचे सातत्याने परीक्षण करण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात आले.
आरोग्यविषयक जनजागृतीसोबतच नागरिकांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणणे आणि गावकऱ्यांचा सक्रिय सहभाग वाढविणे आवश्यक असल्याचे कार्यशाळेत अधोरेखित करण्यात आले.
कार्यशाळेस गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, तालुका विस्तार अधिकारी, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास, प्राथमिक व माध्यमिक शिक्षण, पाणीपुरवठा व स्वच्छता, आरोग्य आणि इतर विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
गावातील प्रत्येक नागरिकाचे आरोग्य, प्रभावी जनसहभाग आणि विविध विभागांमधील समन्वय यांच्या माध्यमातून सोलापूर जिल्ह्यात ‘आरोग्य संपन्न गाव’ निर्माण करण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी एकत्रितपणे काम करण्याचा निर्धार कार्यशाळेत करण्यात आला.
गावाचा विकास केवळ रस्ते, पाणी आणि इतर पायाभूत सुविधांपुरता मर्यादित न राहता नागरिकांचे आरोग्य, स्वच्छता, सुरक्षित पाणी, पोषण, शिक्षण आणि सामाजिक सहभाग या सर्व बाबींचा समन्वित विकास झाला, तरच खऱ्या अर्थाने ‘आरोग्य संपन्न गाव’ साकार होईल, असा संदेश या कार्यशाळेतून देण्यात आला.



