सोलापूर

शिरापूर उपसा सिंचनाचा पंप बंद; उत्तर सोलापूरच्या पाणीप्रश्नावर इंद्रजित पवारांची महावितरणकडे धाव

अधीक्षक अभियंता सुनील माने यांची भेट; शेतकऱ्यांसाठी दिवसा ८ तास वीज, नवीन डीपी आणि निवासी वायरमनची मागणी

शिरापूर उपसा सिंचनाचा पंप बंद; उत्तर सोलापूरच्या पाणीप्रश्नावर इंद्रजित पवारांची महावितरणकडे धाव

अधीक्षक अभियंता सुनील माने यांची भेट; शेतकऱ्यांसाठी दिवसा ८ तास वीज, नवीन डीपी आणि निवासी वायरमनची मागणी

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील शिरापूर उपसा सिंचन योजनेचा पंप नियमित वीजपुरवठ्याअभावी बंद असल्याने तालुक्यातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिक आणि शेतकऱ्यांच्या विविध वीज समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी महावितरणचे अधीक्षक अभियंता सुनील माने यांची भेट घेतली. शिरापूर उपसा सिंचनाचा पंप तातडीने कार्यान्वित करण्यासाठी पुरेसा व नियमित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या माध्यमातून उत्तर सोलापूर तालुक्यातील पाणीपुरवठ्यासाठी आवश्यक पाणी उपलब्ध होण्यास मदत होते. त्यामुळे पंप दीर्घकाळ बंद राहिल्यास त्याचा परिणाम तालुक्यातील पाणीपुरवठ्यावर होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंपासाठी आवश्यक वीजपुरवठा सुरळीत करून तो तातडीने सुरू करण्याची मागणी पवार यांनी अधीक्षक अभियंता माने यांच्याकडे केली.

यावेळी उत्तर सोलापूर तालुक्यातील वीज वितरण व्यवस्थेतील विविध समस्यांबाबतही सविस्तर चर्चा करण्यात आली. ग्रामीण भागात जळालेला डीपी बदलल्यानंतर अवघ्या तीन ते चार दिवसांत पुन्हा डीपी जळण्याच्या घटना घडत असल्याने नागरिक आणि शेतकऱ्यांना वारंवार वीज खंडित होण्याचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आणून देण्यात आले. केवळ डीपी बदलण्याऐवजी वारंवार बिघाड होण्यामागील तांत्रिक कारणांचा शोध घेऊन कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी मागणी करण्यात आली.

शेतकऱ्यांना सिंचनासाठी पुरेसा वीजपुरवठा मिळावा यासाठी दिवसा आठ तास नियमित वीजपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली. आवश्यक ठिकाणी वीज वितरणाचा अतिरिक्त भार लक्षात घेऊन नवीन डीपी उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी करण्यात आली.

ग्रामीण भागात वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर दुरुस्ती पथक पोहोचेपर्यंत लागणारा वेळ कमी करण्यासाठी निवासी वायरमनची नियुक्ती करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. स्थानिक पातळीवर वायरमन उपलब्ध असल्यास वीजपुरवठ्यातील तांत्रिक बिघाड तातडीने दूर करण्यास मदत होईल, असे यावेळी निदर्शनास आणून देण्यात आले.

उत्तर सोलापूर तालुक्यातील वीजपुरवठ्याशी संबंधित प्रश्न तातडीने मार्गी लावून शिरापूर उपसा सिंचनाचा पंप सुरू करणे, वारंवार जळणाऱ्या डीपींचा कायमस्वरूपी प्रश्न सोडविणे, शेतकऱ्यांना दिवसा आठ तास वीजपुरवठा करणे, आवश्यक ठिकाणी नवीन डीपी बसविणे आणि निवासी वायरमन नियुक्त करणे, याबाबत सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली.

नागरिक आणि शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनाशी तसेच शेतीच्या सिंचनाशी संबंधित या समस्या प्राधान्याने सोडविल्यास तालुक्यातील वीजपुरवठा अधिक सुरळीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी अरुण बारसकर, विनायक सुतार (जिल्हाध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चा )अमोल साठे, शंकर साठे, महादेव कदम आदी उपस्थित होते.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!