महाराष्ट्र

मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणीनंतर सोलापूरला मोठा दिलासा; जिल्ह्यातील सर्व ११ तालुके दुष्काळी घोषित

राज्यातील ३१ जिल्ह्यांतील २६५ तालुक्यांना Trigger-1; जमीन महसूल, कर्जवसुली, वीजबिल, परीक्षा शुल्कासह विविध सवलती लागू

मुख्यमंत्र्यांच्या दुष्काळ पाहणीनंतर सोलापूरला मोठा दिलासा; जिल्ह्यातील सर्व ११ तालुके दुष्काळी घोषित

राज्यातील ३१ जिल्ह्यांतील २६५ तालुक्यांना Trigger-1; जमीन महसूल, कर्जवसुली, वीजबिल, परीक्षा शुल्कासह विविध सवलती लागू

सोलापूर : खरीप हंगाम २०२६ मध्ये अपुरा पाऊस आणि दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकरी व नागरिकांसाठी राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाने २५ सप्टेंबर २०२६ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार राज्यातील ३१ जिल्ह्यांतील २६५ तालुक्यांमध्ये Trigger-1 (प्रथम कळ) लागू करून दुष्काळी उपाययोजना व विविध सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ११ तालुक्यांचा या यादीत समावेश करण्यात आला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस आणि मंगळवेढा या सर्व ११ तालुक्यांमध्ये Trigger-1 लागू झाला आहे. त्यामुळे संपूर्ण जिल्ह्यात दुष्काळी उपाययोजनांची अंमलबजावणी करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

• मुख्यमंत्री दौऱ्यानंतर सोलापूरकडे विशेष लक्ष •

अवघ्या काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर, बार्शी आणि सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील कारंबा येथे दुष्काळसदृश परिस्थितीची पाहणी केली होती. कारंबा येथे शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन खरीप पिकांची परिस्थिती जाणून घेतल्यानंतर शेतकऱ्यांच्या अडचणी आणि नुकसानाची माहिती घेण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर आता शासनाने काढलेल्या निर्णयात सोलापूर जिल्ह्यातील एकही तालुका वगळलेला नाही, ही बाब जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीची तीव्रता अधोरेखित करणारी ठरली आहे.

• पंचनामे तातडीने करण्याचे आदेश •

Trigger-1 लागू झालेल्या २६५ तालुक्यांमध्ये संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी पंचनाम्याची कार्यवाही तातडीने सुरू करावी, असे शासनाने निर्देश दिले आहेत. सर्वेक्षण केलेल्या क्षेत्रातील पिकांची सद्यस्थिती दर्शविणारी छायाचित्रे तसेच GPS Coordinates संकलित करून पिकांच्या परिस्थितीचा अहवाल कृषी आयुक्तांमार्फत शासनाकडे सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील ११ तालुक्यांमध्येही खरीप पिकांच्या नुकसानीचे प्रत्यक्ष सर्वेक्षण, पंचनामे आणि संबंधित अहवाल तयार करण्याची प्रक्रिया आता महत्त्वाची ठरणार आहे.

• सोलापूरच्या शेतकऱ्यांना कोणत्या सवलती? •

दुष्काळी घोषित करण्यात आलेल्या २६५ तालुक्यांसाठी शासनाने विविध १२ उपाययोजना व सवलती लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याचा लाभ सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुक्यांतील पात्र लाभार्थ्यांना मिळणार आहे.

यामध्ये,जमीन महसुलात सूट
* पीक कर्जाचे पुनर्गठन
* शेतीशी संबंधित कर्जाच्या वसुलीला स्थगिती
* कृषी पंपाच्या चालू वीजबिलात सूट
* शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्कात माफी
* रोजगार हमी योजनेच्या कामांच्या निकषात शिथिलता आणून जास्तीत जास्त कामे सुरू करणे
* आवश्यक ठिकाणी पिण्याच्या पाण्यासाठी टँकर
* टंचाई जाहीर केलेल्या गावांमध्ये शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज जोडणी खंडित न करणे
* शेतीवर अवलंबून असलेल्या शेतकरी व मजुरांना अन्नधान्याची उपलब्धता
* जनावरांसाठी आवश्यक चारा उपलब्ध करून देणे
* जलसंधारणाची कामे सुरू करणे
* पिण्याचे पाणी व जनावरांच्या पाण्याचे योग्य नियोजन  या उपाययोजनांचा समावेश आहे.

• वीजबिलाबाबतही महत्त्वाचा निर्णय •

शासन निर्णयात कृषी पंपांच्या चालू वीजबिलात सवलतीचा उल्लेख करण्यात आला आहे. ७.५ अश्वशक्तीपर्यंत क्षमतेच्या कृषी पंपांचे वीजबिल यापूर्वीच माफ करण्यात आले आहे, तर त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या पंपांना सदर सवलत लागू राहणार असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे.

• पीक नुकसान भरपाईसाठी स्वतंत्र शासन निर्णय •

दरम्यान, या शासन निर्णयामुळे दुष्काळी उपाययोजना आणि सवलती लागू झाल्या असल्या तरी पीक नुकसानीची प्रत्यक्ष आर्थिक मदत अद्याप या निर्णयातून जाहीर करण्यात आलेली नाही.

२६५ तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना शेतपिकांच्या नुकसानीबाबतची मदत विहित कार्यपद्धती पूर्ण केल्यानंतर स्वतंत्र शासन निर्णयाद्वारे जाहीर केली जाणार आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष आता पंचनामे आणि त्यानंतर जाहीर होणाऱ्या पीक नुकसान भरपाईच्या निर्णयाकडे लागले आहे.

 

• सोलापूर जिल्ह्याचे सर्व ११ तालुके यादीत •

या निर्णयातील सोलापूर जिल्ह्याची यादी विशेष महत्त्वाची ठरली आहे. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, बार्शी, अक्कलकोट, मोहोळ, माढा, करमाळा, पंढरपूर, सांगोला, माळशिरस आणि मंगळवेढा या सर्व ११ तालुक्यांना Trigger-1 लागू करण्यात आला आहे.

यामुळे सोलापूर जिल्ह्याचा संपूर्ण ग्रामीण भाग दुष्काळी उपाययोजनांच्या कक्षेत आला असून, पाणी, चारा, रोजगार, वीज, कर्ज आणि पीक नुकसानीच्या प्रश्नांवर प्रशासनाला तातडीने कार्यवाही करावी लागणार आहे.

• राज्यात २६५ तालुके दुष्काळी •

कृषी आयुक्तांच्या २४ सप्टेंबर २०२६ रोजीच्या अहवालाच्या आधारे जूनपासून आतापर्यंतच्या पर्जन्याची तूट तसेच इतर दुष्काळी घटकांचा विचार करण्यात आला. त्यानंतर राज्यातील ३१ जिल्ह्यांतील एकूण २६५ तालुक्यांमध्ये Trigger-1 (प्रथम कळ) लागू असल्याचे शासनाने नमूद केले आहे.

 

या निर्णयामुळे दुष्काळग्रस्त भागांमध्ये केवळ पीक नुकसानीचा प्रश्न न राहता पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा, रोजगार, कृषी कर्ज, वीज आणि अन्नधान्य या सर्व बाबींवर प्रशासनाला नियोजनबद्ध उपाययोजना कराव्या लागणार आहेत.

सोलापूर जिल्ह्यातील सर्व ११ तालुके दुष्काळी यादीत आल्याने मुख्यमंत्री दौऱ्यानंतर जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीला शासनस्तरावर अधिकृत मान्यता मिळाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

दैनिक प्रबुध्द राज न्युज पोर्टल ला बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क करा संपादक:- श्रीशैल चिंचोळीकर 9503822387

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!