एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य; १ ऑक्टोबरपासून नवी व्यवस्था
ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी कार्ड नोंदणी सुरू; QR कोड पावतीला ३० दिवसांची मुदत
एसटीच्या सवलतीच्या प्रवासासाठी NCMC कार्ड अनिवार्य; १ ऑक्टोबरपासून नवी व्यवस्था
ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांसाठी कार्ड नोंदणी सुरू; QR कोड पावतीला ३० दिवसांची मुदत
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांसाठी आता डिजिटल पद्धतीचा वापर करण्यात येणार आहे. अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक तसेच महिला प्रवाशांना सवलतीच्या दरात प्रवास करताना १ ऑक्टोबर २०२६ पासून NCMC (National Common Mobility Card) कार्डचा वापर अनिवार्य करण्यात येणार आहे. सवलतीचे तिकीट वितरित करण्याची प्रक्रिया NCMC कार्डशी जोडण्याचा निर्णय एसटी महामंडळाने घेतला आहे.

एसटी महामंडळाकडून शासनाच्या निर्देशानुसार समाजातील विविध घटकांना प्रवास भाड्यात सवलत दिली जाते. त्यामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना देण्यात येणाऱ्या सवलतींचा समावेश आहे. या सवलतीच्या प्रवासाची नोंद अधिक अचूक, सुलभ आणि डिजिटल पद्धतीने ठेवण्यासाठी NCMC कार्ड प्रणाली लागू करण्यात येत आहे.
• आगार व बसस्थानकांवर नोंदणीची सुविधा •
NCMC कार्डसाठी राज्यभरातील एसटी आगार आणि बसस्थानकांवर नोंदणी व वितरणाची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे सवलतीचा लाभ घेणाऱ्या प्रवाशांनी १ ऑक्टोबरपूर्वी NCMC कार्डची नोंदणी करून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
ज्या प्रवाशांकडे NCMC कार्ड नोंदणी करून मिळालेले QR कोड असलेले प्रमाणपत्र अथवा पावती आहे, त्यांनाही कार्ड Active होईपर्यंत सवलतीचा लाभ घेता येणार आहे. वाहकाच्या ईटीएम मशीनद्वारे QR कोड स्कॅन करून सवलतीचे तिकीट वितरित केले जाणार आहे.
ही QR कोडयुक्त नोंदणी पावती ३० दिवसांपर्यंत ग्राह्य राहणार आहे. या कालावधीत संबंधित प्रवाशांनी आपले NCMC कार्ड Active करून त्यामध्ये आवश्यक Top-up करणे अपेक्षित आहे.
१ ऑक्टोबरपासून सवलतीचे तिकीट देताना NCMC कार्डचा वापर केला जाणार असल्याने प्रवाशांना प्रवासाच्या वेळी कार्ड सोबत ठेवणे आवश्यक ठरणार आहे. कार्ड किंवा वैध QR कोड पावतीच्या आधारे वाहक ईटीएम मशीनवर आवश्यक प्रक्रिया करून सवलतीचे तिकीट देणार आहे.
• प्रवाशांनी वेळेत प्रक्रिया पूर्ण करण्याचे आवाहन •
नवीन डिजिटल प्रणालीमुळे सवलतीच्या प्रवासाची नोंद अधिक व्यवस्थित होण्यास मदत होणार आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक आणि महिला सवलतधारक प्रवाशांनी गर्दी टाळण्यासाठी आगार अथवा बसस्थानकावर जाऊन NCMC कार्डची नोंदणी, Active प्रक्रिया आणि Top-up वेळेत पूर्ण करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
१ ऑक्टोबरपासून लागू होणाऱ्या या नव्या व्यवस्थेमुळे एसटीच्या सवलतीच्या प्रवासात डिजिटल कार्ड प्रणालीचा वापर अधिक व्यापक होणार असून, सवलतधारक प्रवाशांनी बदलत्या प्रक्रियेची नोंद घेणे आवश्यक आहे.



