सोलापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत अवतरले ‘तुकाराम मुंढे’!
यंदा तुझ्यामुळे अस्सल खवा मोदक खायला मिळाले!’; पंचमुखी कला व सांस्कृतिक मंडळाच्या देखाव्याने भेसळीविरोधात दिला जनजागृतीचा संदेश
सोलापुरात गणेश विसर्जन मिरवणुकीत अवतरले ‘तुकाराम मुंढे’!
‘यंदा तुझ्यामुळे अस्सल खवा मोदक खायला मिळाले!’; पंचमुखी कला व सांस्कृतिक मंडळाच्या देखाव्याने भेसळीविरोधात दिला जनजागृतीचा संदेश
सोलापूर : गणेश विसर्जन मिरवणुकीत दरवर्षी सामाजिक, शैक्षणिक तसेच जनजागृतीपर संदेश देणारे विविध देखावे सोलापूरकरांचे लक्ष वेधून घेतात. यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत विजापूर रोड येथील पंचमुखी कला व सांस्कृतिक मंडळाने साकारलेला अनोखा देखावा विशेष चर्चेचा विषय ठरला आहे. या देखाव्यात FDA अधिकारी तुकाराम मुंढे यांचे भव्य पोस्टर, श्री गणरायाची मूर्ती आणि खाद्यपदार्थांच्या माध्यमातून भेसळीविरोधातील संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला.
‘यंदा तुझ्यामुळे अस्सल खवा मोदक खायला मिळाले!’ तसेच ‘तुकाराम मुंढेंमुळे मला चांगला मोदक मिळतोय… खव्याचा मोदक मिळतोय’ अशा आशयाचे संदेश या देखाव्यातून देण्यात आले. त्यामुळे विसर्जन मिरवणुकीतून जाणाऱ्या नागरिकांचे या देखाव्याकडे लक्ष वेधले गेले.

देखाव्यावर ‘सुरक्षित अन्न • सुरक्षित औषध • सुरक्षित महाराष्ट्र’ आणि ‘STOP ADULTERATION’ असे संदेश ठळकपणे प्रदर्शित करण्यात आले होते. ‘भेसळ म्हणजे काय?’, ‘मिलावट’, ‘बनावट’, ‘आरोग्याशी खेळ’ आणि ‘शिक्षा योग्य’ अशा संदेशांच्या माध्यमातून अन्नपदार्थातील भेसळीचे गांभीर्य नागरिकांसमोर मांडण्यात आले.
विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात मोदक, मिठाई, दूध, खवा आणि इतर दुग्धजन्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यांची गुणवत्ता आणि सुरक्षितता तपासावी, तसेच भेसळयुक्त पदार्थांपासून सावध राहावे, असा संदेश मंडळाने दिला.
• ‘मी केवळ माझे काम करत आहे…’ •
देखाव्यातील संदेशांमधून ‘मी केवळ माझे काम करत आहे; तुमच्या ताटापर्यंत स्वच्छ व सुरक्षित अन्न पोहोचवणे हेच आमचे उद्दिष्ट’ असा आशयही मांडण्यात आला. त्यामुळे केवळ मनोरंजनापुरता मर्यादित न राहता गणेशोत्सवाच्या माध्यमातून सामाजिक जबाबदारी आणि नागरिकांच्या आरोग्याचा मुद्दा प्रभावीपणे मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला.
• तुकाराम मुंढेंच्या पोस्टरचीच सर्वाधिक चर्चा •
पंचमुखी कला व सांस्कृतिक मंडळाने उभारलेल्या या देखाव्यात तुकाराम मुंढे यांचे भव्य पोस्टर, गणरायाची मूर्ती आणि खव्याच्या मोदकाचा उल्लेख यामुळे नागरिकांमध्ये विशेष कुतूहल निर्माण झाले. विसर्जन मिरवणुकीदरम्यान अनेकांचे लक्ष या देखाव्याकडे वेधले गेले असून, ‘तुकाराम मुंढे’ यांच्या रूपातील संदेशाची सोलापुरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
गणेशोत्सवातील उत्साहाला सामाजिक जनजागृतीची जोड देत भेसळमुक्त अन्न, सुरक्षित खाद्यपदार्थ आणि नागरिकांचे आरोग्य हा विषय सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविण्याचा पंचमुखी कला व सांस्कृतिक मंडळाचा हा प्रयत्न मिरवणुकीतील लक्षवेधी ठरला.



