एसटीच्या तिकिटदरात वाढ; सोलापूर–पुणेसह प्रमुख मार्गांवरील प्रवासासाठी अधिक मोजावे लागणार
१७-१८ जुलैच्या मध्यरात्रीपासून सुधारित भाडेदरांची अंमलबजावणी; विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांचे प्रवाशांना आवाहन

एसटीच्या तिकिटदरात वाढ; सोलापूर–पुणेसह प्रमुख मार्गांवरील प्रवासासाठी अधिक मोजावे लागणार
१७-१८ जुलैच्या मध्यरात्रीपासून सुधारित भाडेदरांची अंमलबजावणी; विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांचे प्रवाशांना आवाहन
सोलापूर : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) प्रवासी भाड्यात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून, १७ जुलै व १८ जुलै २०२६ च्या मध्यरात्रीपासून सुधारित भाडेदर राज्यभर लागू झाले आहेत. शासनाच्या स्वयंचलित भाडेवाढ सूत्रानुसार डिझेल, चेसिस, टायर आणि महागाई भत्त्याच्या दरात झालेल्या वाढीमुळे ही दरवाढ करण्यात आली आहे.
महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, साधी, जलद, मिडी, रातराणी, जिजाऊ, विनावातानुकूलित शयन आसनी तसेच विनावातानुकूलित शयनयान या सेवांच्या प्रवास भाड्यात वाढ करण्यात आली आहे. याशिवाय शिवशाही, ई-शिवाई, निमआराम आणि ई-बस (९ व १२ मीटर) या सेवांचे अंतिम भाडेही रुपये पाचच्या पटीत निश्चित करण्यात आले आहे.
नवीन दरानुसार साधी, जलद, मिडी, रातराणी आणि जिजाऊ सेवांचा प्रति टप्पा दर १०.०५ रुपयांवरून ११.४० रुपये करण्यात आला असून, ही वाढ सुमारे १३.४३ टक्के आहे. विनावातानुकूलित शयन आसनी सेवेचा प्रति टप्पा दर १३.६५ रुपयांवरून १५.५० रुपये, तर विनावातानुकूलित शयनयान सेवेचा दर १४.७५ रुपयांवरून १६.७५ रुपये करण्यात आला आहे. या दोन्ही सेवांमध्येही सुमारे १३.५ टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे.
दरवाढीनंतर काही प्रमुख मार्गांवरील प्रवास खर्चातही वाढ झाली आहे. सोलापूर–पुणे, पंढरपूर–पुणे आणि अक्कलकोट–पुणे या मार्गांवरील साधी तसेच शयन आसनी आणि शयनयान सेवांचे भाडे सुधारित करण्यात आले असून, प्रवाशांनी प्रवासापूर्वी नवीन भाडेदरांची माहिती घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सोलापूर विभागाचे विभाग नियंत्रक अमोल गोंजारी यांनी सर्व प्रवाशांनी सुधारित भाडेदरांची नोंद घ्यावी आणि त्यानुसार प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन केले आहे. राज्य शासनाच्या निर्णयानुसार ही भाडेवाढ तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आली असून, राज्यातील सर्व एसटी आगारांमध्ये नवीन दरानुसार तिकिटे देण्यात येत आहेत.



